शिक्षकांचा सूर ; अमळनेर तहसील कार्यालयात मतदार दिन
अमळनेर- लोकशाहीत मतदानाला मोठे महत्व असून निकोप लोकशाहीसाठी आमिषाला बळी न पडता प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरूजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका शारदा उंबरकर व शिक्षक अरुण पाटील यांनी येथे केले. शुक्रवारी मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या आवारात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी उंबरकर म्हणाल्या की, लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याची तसेच बोलण्याची संधी आहे त्यासोबतच आपल्या पसंतीचा राज्यकर्ता निवडून देण्याचीदेखील संधी आहे. काम करणार्या नेत्याला निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क हा महत्त्वपूर्ण ठरतो. आपले एक मत अमूल्य असून त्यामुळे कुणाचातरी विजय अथवा पराजय होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
मतदानाबाबत जनजागृती
कार्यक्रमप्रसंगी मतदाराचे वय किती असावे, मतदाराने नाव नोंदणी कोठे करावी, कोणत्या उमेदवाराला मतदान करावे, कोणत्याही मोहाला बळी न पडता मतदान करावे, दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर येण्या-जाण्यासाठी केलेली वाहनाची व्यवस्था अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन ‘मतदान जनजागृती’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. प्रसंगी अरुण पाटील व शारदा त्र्यंबक उंबरकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना हेमकांत अनंतराव पाटील, सचिव संदीप बाबुराव घोरपडे, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख ज्येष्ठ शिक्षक सुनील पाटील, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
मॅरेथॉन स्पर्धेत साने गुरूजी विद्यालयाचे यश
मतदार दिनानिमित्त अमळनेर पंचायत समिती व तहसील कार्यालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत साने गुरूजी नुतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शुभम शरद पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्याला अमळनेरचे तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याहस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. या विद्यार्थ्याला संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थाध्यक्ष हेमकांत अनंतराव पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख व शिक्षकांनी अभिनंदन केले.