मुंबई – आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे प्रकार टाळण्यासाठी अशा प्रकरणातल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
टेम्पल रोझ रियल इस्टेट कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना या कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधि विभागाशी चर्चा सुरू आहे असे ते म्हणाले. फसवणूक करणाऱ्याची संपत्ती तीन महिन्यांच्या आत जप्त करणे, खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी ही संपत्ती विकण्यास परवानगी मिळावी तसेच संपत्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केली असल्यास तो व्यवहार अवैध ठरवावा, अशा सुधारणा या कायद्यात करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हेमंत टकले, विद्या चव्हाण, प्रवीण दरेकर, धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे आदींनी उपप्रश्न विचारले.
मीरा-भाईंदरला पोलीस आयुक्तालय
मीरा-भार्इंदर भायंदर आणि वसई यांचे एकत्रित पोलीस आयुक्तालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. प्रस्तावित पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत ३९ लाख इतकी लोकवस्ती असणार आहे. मीरा-भार्इंदर परिसरातील सहा तसेच वसई भागातील सात पोलीसठाणी व सुमारे ४६ संवेदनशील ठिकाणे या आयुक्तालयांतर्गत असतील, असेही ते म्हणाले. याशिवाय, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि अकोला अशा तीन ठिकाणी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद ठाकूर यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न विचारला होता.
पोलिसांची चौकशी
नागपूरच्या सक्करदरा येथील ४० वर्षीय महिलेची नोकरीचे अमिष दाखवून सौदी अरेबियात दोन लाखांना विक्री केल्याच्या प्रकरणी आरोपींना जामीन मिळावा यासाठी पोलिसांनी मदत केली असल्यास त्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. भारतीय जनता पार्टीचे परिणय फुके यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न विचारला होता.
राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढेल
नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे अनेक विमानांना उतरण्याची परवानगी दिली जात नाही. याचा परिणाम पर्यंटनासह अनेक क्षेत्रावर होतो. नवी मुंबई विमानतळ ट्रान्स हार्बर, मेट्रो तसेच जलवाहतुकीने जोडले जाणार असून ट्रान्स हार्बर लिंकचे काम विमातळाचे काम झाल्यानंतर आठ ते नऊ महिन्यांत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.