शासकीय अतिक्रमण केल्याचा फटका ; जिल्हाधिकार्यांचा निकाल
फैजपूर- येथून जवळच असलेल्या आमोदे ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश शंकर कपले यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी त्यांना अपात्र ठरवल्याने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमोदे गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा भूमापन क्रमांक 482/1 मध्ये 200 पत्रांचे पत्री शेड टाकून अतिक्रमण केल्याप्रकरणी विजय सीताराम अभंग यांनी केलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम (ज-3) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
पदाचा दुरुपयोग भोवला
तत्कालीन उपसरपंच तथा सत्तारूढ सदस्य गणेश कपले यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून गावातील मुख्य रस्त्यावर शिवशंकर इंडस्ट्रीज या नावाने धान्य सफाईचा उद्योग सुरू केला. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ओपन स्पेसमध्ये सन 2011 पासून पत्रीशेड टाकून जागेवर अतिक्रमण केले होते. या विरोधात 7 डिसेंबर 2015 रोजी येथील रहिवासी तथा ग्रा.पं. सदस्य विजय सीताराम अभंग यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सुनावणी करून कपले यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द केले. गेल्या चार वर्षापासून राजकीय दबावामुळे कारवाई करण्यात येत नव्हती आणि चौकशी वर चौकशीचा कांगावा अधिकार्यांकडून करण्यात येत होता. तब्बल चार वर्षांनंतर कपले यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे गावात युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या कारवाईनंतर दोनशे पत्रांच्या शेडचे अतिक्रमण केव्हा काढण्यात येईल ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.