आमोद्यासह भालोद-बामणोद उपसा सिंचन योजनांच्या नूतनीकरण व पुनरुज्जीवनास मान्यता

0

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ; जलसंपदा नियामक मंडळाने दिली मान्यता

फैजपूर- तालुक्यातील आमोद्यासह भालोद-बामणोद उपसा सिंचन योजनांच्या नूतनीकरण व पुनरुज्जीवनास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार आमोदा उपसा सिंचन योजनेच्या 27.39 कोटी, भालोद उपसा सिंचन योजनेच्या 29.50 व बामणोद उपसा सिंचन योजनेच्या 21.63 कोटी रुपयांच्या उपसा सिंचन नूतनीकरण व पुनरुज्जीवन करण्याच्या अंदाजपत्रकास मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आमदार हरिभाऊ जावळेंचा यशस्वी पाठपुरावा
गेल्या काही वर्षांमध्ये यावल तालुक्यातील भूजलात मोठी घसरण झाल्याने संपूर्ण बागायती क्षेत्र धोक्यात आलेले होते. यावल तालुक्यातील आमोदा, बामणोद या उपसा सिंचन योजना अत्यंत जुन्या झाल्याने जीर्ण अवस्थेत आहेत तर भालोद उपसा सिंचन योजना बंद स्थितीत असून या योजना जुन्या व बंद असल्याने शेतकर्‍यांना सिंचनासाठी वेळच्या वेळी पाणी न मिळाल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे ऊस व केळीसारख्या नगदी पिकांचे लागवडीचे प्रमाण घटून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत होते. या उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांनी आमदार हरीभाऊ जावळे यांच्याकडे निवेदन दिले होते. या शेतकर्‍यांच्या अडचणीची दाखल घेत आमदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे योजनांचे नूतनीकरण व पुनरुज्जीवन करण्यासाठी आग्रहाची विनंती केली होती. मंत्री महाजन यांनीउपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्रस्ताव सादर करण्यास आदेश दिले होते. तापी पाटबंधारे महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार आमोदा उपसा सिंचन योजनेच्या 27.39 कोटी, भालोद उपसा सिंचन योजनेच्या 29.50 व बामणोद उपसा सिंचन योजनेच्या 21.63 कोटी रुपयांच्या उपसा सिंचन नूतनीकरण व पुनरुज्जीवन करण्याच्या अंदाजपत्रकास मंत्रालयात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे यावल तालुक्यातील जवळपास दोन हजार 600 हेक्टर क्षेत्रावरील शेतीस सिंचनासाठी पाणी पुरवठ्याचे काम होईल व त्यामुळे ऊस, केळी यासारख्या नगदी पिकांना सिंचनास पाणी उपलब्ध होऊ शकेल. याप्रसंगी नियामक मंडळाच्या बैठकीत विजय शिवतारे, आमदार हरिभाऊ जावळे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.