आम्हाला अडकविण्यासाठी मुंबईतून पोलिसांवर दबाव

0

सुनील झंवर हा आरोप करणार्‍यांचाही मित्रच: गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट

जळगाव – मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या विषयावरून निंभोरा पोलीस ठाण्यात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी दिलेली तक्रार ही हास्यास्पद असुन आम्हाला अडकविण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. ऐनकेन प्रकारे मला आणि माझ्या सहकार्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असुन अ‍ॅड. विजय पाटील यांच्यामागे बोलविता धनी वेगळाच आहे. ही तक्रार दाखल करून घेण्यासाठी मुंबईतून गृहखात्याकडून दबाव असल्याची माहिती भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान बीएचआर प्रकरणी फरार असलेला सुनील झंवर याचे सर्वच राजकीय पक्षांशी संबध असुन तो आरोप करणार्‍यांचाही मित्रच असल्याचा गौप्यस्फोटही आमदार महाजन यांनी केला.

मविप्र संस्थेच्या वादावरून अ‍ॅड. विजय पाटील यांनी पुण्यात घडलेल्या घटनेची जळगाव जिल्ह्यातील निंभोरा येथे तीन वर्षानंतर तक्रार दिली. यात भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन त्यांचे सहकारी रामेश्वर नाईक यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात माहिती देण्यासाठी भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. आमदार महाजन यांनी माहिती देतांना सांगितले की, दि. ८ जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या घटनेची तक्रार तीन वर्षांनंतर देण्याचे अ‍ॅड. विजय पाटील यांना सुचले. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी त्यांना पुण्यात मारहाण केल्याचा त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. हा सगळा बनावट प्रकार असुन ही तक्रार स्क्वॅश करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. दि. ७ जानेवारीपर्यंत यात कुठलीही कारवाई करू नये असे न्यायालयाने आदेश दिले आहे. मविप्र संस्था ही सामाजिक संस्था आहे. या संस्थेशी आपला कुठलाही संबंध नाही. बनावट घटना तयार करून तीन वर्षानंतर तक्रार दाखल करणे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली आहे. याउलट अ‍ॅड. विजय पाटील हे स्वत: मविप्र संस्थेच्या वादातून जेलमध्ये होते. माझा सहकार रामेश्वर नाईक याच्यावर आजपर्यंत साधी एनसी देखील दाखल नाही, असे असतांना कुठेतरी आम्हाला अडकविण्यासाठी मुंबईतून दबाव आणला जात असल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला.

सुनील झंवरचे सगळ्यांशीच घनीष्ट संबंध
बीएचआर प्रकरणात पोलीसांना हवा असलेला सुनील झंवर याचे सगळ्याच पक्षांशी संबंध आहेत. अगदी जे लोक त्याचे नाव घेऊन आमच्यावर आरोप करीत आहे त्यांचा देखिल सुनील झंवर मित्रच आहे. सुनील झंवरच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आमच्यावर निशाणा साधण्याचा काही जणांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. बीएचआरची चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल असेही आमदार महाजन यांनी सांगितले.

आमचा एकही आमदार फुटणार नाही
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. जिल्ह्यातही काही जण आमचे महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीचे नेते कितीही म्हणत असले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही आम्ही एकसंघ आहोत असेही आमदार महाजन म्हणाले.

जशास तसे उत्तर देऊ
सत्ता गेली आणि आता आपण सत्ताधारी पक्षात आहे म्हणून कुणी आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. आमची बदनामी करणार्‍यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ. खोटेनाटे काही आम्ही करणार नाही. जे करू ते खरेच करू असे आव्हानही आमदार महाजन यांनी विरोधकांना दिले आहे