आम्हाला गणवेश द्या

0

बारामती । गणवेशासाठी बारामती नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी मंगळवारी रस्त्यावर उतरले होते. या मुलांनी सकाळी 8 च्या दरम्यान नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक मारली होती. मुख्य प्रवेशद्वार अडवून आम्हाला गणवेश द्या, अशा जोरात घोषणा दिल्या. स्वातंत्र्यदिनी केलेल्या आंदोलनामुळे नगरपालिकेची अब्रु चव्हाट्यावर आली आहे.

दोन वर्षांपासून गणवेशापासून वंचित
गेल्या दोन वर्षांपासून नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी गणवेशापसून वंचित आहेत. वारंवार शिक्षकांकडे विचारणा करूनही गणवेश मिळत नाहीत. नगरपालिकेकडेनच गणवेश आले नसल्याचे शिक्षकांकडून सांगितले जाते, असे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. आज आम्ही अक्षरश: फाटक्या कपड्यांवरती येथे आलो, याची आम्हालाच लाज वाटते, असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.

ठिय्या आंदोलन
विद्यार्थी दिड तास प्रवेशद्वारावरती ठिय्या मांडून बसले होते. मात्र नगरपालिकेचे पदाधिकारी वा अधिकारी कोणीही भेटण्यास त्यांना आले नाही. नगरपालिकेच्या अजब काराभाराबात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोन वर्षापासून आम्ही टेंडर काढलेले आहे. संबंधित ठेकेदाराने उपठेकेदार म्हणून दुसर्‍याला ऑर्डर दिली. हा उपठेकेदार बारामतीतील बलाढ्य कापड दुकानदार असल्याचे समजते. त्यामुळे ठेकेदार व उपठेकेदार यांच्यात नेमके काय घडले आहे हे समजण्यास मार्ग नाही.