स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक जिंका, पाकिस्तानने मोदींना फटकारले
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांवर आरोप करताना पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदींच्या या वक्तव्याला पाकिस्तानने कडाडून विरोध केला असून, ‘हिंदुस्थानने त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणात आम्हाला आणू नये. हे उद्योग बंद करुन स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढवावी,’ अशा शब्दांत पाकिस्तानने मोदींना फटकारले. हिंदुस्थानकडून होत असलेले आरोप अत्यंत बेजबाबदार आणि निराधार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केलेे. मोदींनी प्रचारसभेदरम्यान, पाकिस्तानचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना ‘पाकिस्तानवर कोणाचे प्रेम आहे, ते सगळ्यांना माहित आहे’, असे म्हणत काँग्रेसने मोदींकडेच इशारा केला. या सगळ्या प्रकारामुळे विकासाचा मुद्दा बाजूला राहून नवाच वाद उफाळून आला. दुसरीकडे, भाजप खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही मोदींना सल्ला दिल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. दररोज नवनवीन ट्विस्ट निर्माण करण्याऐवजी थेट विकासाच्या मुद्द्यावर या. जातीयवादाने वातावरण गढूळ करण्याऐवजी चांगले राजकारण करा, अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी मोदींना सुनावले आहे.
जातीयवादी राजकारण सोडा; शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींना सल्ला
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ट्विटवरून आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या निवडणुकीच्या राजकारणात पाकिस्तानला आणणे हिंदुस्थानने थांबवावे. अशा प्रकारच्या कटकारस्थानांचे आरोप करण्याऐवजी स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक जिंकायला हवी. सध्या सुरू असलेले आरोप बिनबुडाचे आणि बेजबाबदारपणा दर्शवणारे आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांची बैठक झाली होती, असे मोदींनी म्हटले होते. मात्र मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत केवळ दोन देशांच्या संबंधांवर चर्चा झाली. अन्य कोणत्याही मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली नव्हती, असे काँग्रेसने सांगितल्यानंतर मोदी तोंडघशी पडले होते. खा. शत्रुघ्न सिन्हा यांनीही ट्वीटरद्वारे मोदींना सुनावले. ट्वीटमध्ये सिन्हा यांनी म्हटले आहे की, आदरणीय सर, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी दररोज प्रतिस्पर्ध्याविरोधात आरोपांची राळ उडवली जात आहे. या आरोपांवर विश्वास ठेवणेदेखील कठीण आहे. आता विरोधकांचे नाव पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाशी जोडणार का? निवडणुकीच्या राजकारणात जातीयवादी फाटे फोडण्याऐवजी आपण दिलेल्या आश्वासनांबद्दल बोला. गृहबांधणी, रोजगार, आरोग्य, विकास मॉडेलबद्दल भाष्य करा.