आम्हाला शिकवू नका; ‘भाऊं’नी ‘दादांना’ ठणकावले!

0

* कचरा निविदेत एक रुपयाचा जरी मिंदा असलो तर राजकारण सोडेन : आ. जगताप
* भाजप मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने नाकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आमचा कारभार करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे प्रत्युत्तर आमदार लक्ष्मण जगताप यांनी अजित पवार यांना दिले आहे. तसेच भाजप मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याचे ते म्हणाले. कचर्‍याची निविदा विरोधकांमुळे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे आणि महापालिकेचे नुकसान होऊ नये यासाठी रद्द केली आहे. कचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयाचा जर मिंदा असेल तर मी राजकारण सोडेन, असेही त्यांनी ठणकावले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना पत्रपरिषदेद्वारे प्रत्युत्तर
शहरात दोन सभा घेऊन अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि महापालिकेच्या कारभारावर हल्लाबोल केला होता. त्याला तातडीने गुरुवारी पत्रकार परिषेद घेऊन भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, शहर प्रवक्ते अमोल थोरात यावेळी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठीच आणि घरोघरचा कचरा उचलण्यासाठी शहराच्या दोन विभागात कचर्‍याची निविदा राबवली होती. राबविलेल्या त्या निविदाप्रक्रिया रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी आणि चुकीच्या मार्गाने जावू नये म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. महापालिकेच्या कचर्‍याचे कामकाज आठ वर्षासाठी 450 कोटी रूपये खर्च करुन देण्यात येणार होते. परंतु, आता ते आठही प्रभागात राबवून कोठेही कचर्‍याचे ढिग पडू नयेत व नागरिकांना कचर्‍याची समस्या भेडसावू नये याकरिता प्रत्येक प्रभागात वेगवेगळी निविदा राबविण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत एक रुपया जर घेतला असेल तर राजकरणातून संन्यास घेण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले.

सत्ता गेल्याने राष्ट्रवादीचा मलिदा बंद झाला!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या श्रीमंत महापालिकेवरची सत्ता गेल्याने राष्ट्रवादीचा मलिदा बंद झाला आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. ते सारखे बसता उठता सत्ता गेल्याची खंत हल्लाबोलच्या माध्यमातून बोलून दाखवत आहेत. पालिकेच्या कारभारावर पारदर्शक पद्धतीनेच काम सुरु आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टप्रवृत्तीला वैतागून पिंपरी-चिंचवड जनतेने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली आहे. जनतेच्या पैशाची जबाबदारी आमच्यावर आहे, तो पैसा योग्य ठिकाणी वापरून विकासकामांचा सपाटा लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमधे पोटसुळ उठत आहे, असे सांगून आ. जगताप म्हणाले, की तोल सुटलेले नेते बेताल वक्तव्य करुन जनतेचे मनोरंजन करू लागले आहेत. त्या मनोरंजनाला जनता कधीच भीक घालणार नाही, त्यांच्या भूलथापाना बळी न पडता भारतीय जनता पक्षावर विश्‍वास दाखवून एकहाती सत्ता दिली त्या विश्‍वासाला काधीही तडा जावू देणार नाही. बारामतीचे पार्सल परत पाठवून जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्‍वास कधीही ढळू देणार नाही. अजितदादांचा हम करे सो कायदा यालाच जनता वैतागली होती. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक भाजपात येण्यासाठी आजही माझ्या संपर्कात आहेत, असेही आ. जगताप म्हणाले.

शहरातील पोलिस चौक्या हप्तेखोरीचे माध्यम झाल्याचे आरोप करणार्‍या खासदारांनी ते सिद्ध करुन दाखवावे. शास्तीकराचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे ते शास्तीकराच्या मुद्यावरुन आंदोलन करण्याची भाषा करत आहेत. केंद्र सरकारशी संदर्भातील रेडझोन, एचएचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आंदोलन करावे. राज्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
– आ. लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष भाजप