आम्हाला बाजू केले नसते तर ही वेळ आली नसती; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

0

मुंबई: अजित पवार यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्याने ८० तासात फडणवीस सरकार कोसळले. यामुळे भाजपची आणि देवेंद्र फडणवीस यांची मोठी नाचक्की झाली आहे. दरम्यान माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाजू केले त्यामुळे २०-२५ आमदार कमी झाले. फडणवीस यांनी आम्हाला बाजूला सारले नसते तर आज ही जी वेळ आली आहे ती आली नसती अशा शब्दात एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मला, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या निष्ठावंताना दूर केले. त्यामुळेच भाजपवर आज ही वेळ आली आहे या शब्दात खडसे यांनी टीका केली. काल मंगळवारी देखील देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी हे सरकार कोसळणार हे अपेक्षित होते असे विधान केले होते. त्यानंतर खडसे यांनी आज हे विधान केले आहे.

ज्यांच्यावर आम्ही सातत्याने आरोप केला अशा लोकांना सोबत घेऊन सरकार बनविण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला. फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्हाला पटला नाही असे देखील खडसे यांनी सांगितले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत तिकीट वाटप करणारे खडसे यांनाच यावेळी तिकीट नाकारण्यात आली. त्यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवार देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. खडसे हे पक्षावर नाराज असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.