आम्हीही नक्षलवादी आहोत का?

0

अहमदनगर-पुण्यात आयोजित करण्यात आलेली एल्गार परिषद मी आणि माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी आयोजित केली होती. याचा नक्षलवाद्यांशी सुतराम संबंध नाही. जर पोलीस तसा दावा करीत असतील, तर मग आम्हाला नक्षलवादाशी जोडले जाणार का ? असा सवाल माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह काही जणांना अटक केली आहे.

अटक अन्यायकारक

‘ही परिषद मी आणि न्यायमूर्ती सावंत यांनी कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आयोजित केली होती. त्याचा ना कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध आहे, ना नक्षलवाद्यांशी. आम्हाला नक्षलवादाचा ‘न’सुद्धा माहिती नाही. तरीही पोलिस तसा दावा करीत असतील, तर मग आम्ही नक्षलवादी ठरू. या एल्गार परिषदेच्या माध्यमातून आम्ही भाजपविरोधी वातावरण तयार करीत आहोत. त्यामुळे जाणीवपूर्व कार्यकर्त्यांना अडकविले जात आहे. ही अप्रत्यक्ष आणीबाणी आणि हुकूमशाही आहे. कोरेगाव भीमाप्रकरणी सुधीर ढवळे आणि अन्य कार्यकर्त्यांची अटक अन्यायकारक आहे.