जळगाव । खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या तीनही जिल्ह्यात बहुतांश प्रमाणात अहिराणी भाषा बोलली जाते. खान्देशवासीयांची खरी ओळख अहिराणी ही बोली भाषेवरुन होते. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील अनेक अहिराणी भाषीकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. खान्देशातील अहिराणी बोलणारे सगळ्यांनी मिळून आम्ही अहिराणी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचे उद्घाटन सोमवारी 1 में रोजी महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेनिमित्त नाशिक येथे होणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन होणार आहे.
फेसबुकच्या माध्यमातून एकत्र
खान्देशातील तीन्ही जिल्ह्यात मोठ्या संख्येने अहिराणी भाषीक आहे. अहिराणी भाषीकांनी एकत्र येऊन समाजासाठी काही तरी नाविन्यपूर्ण संकल्पना उदयास यावी यासाठी प्रयत्न केले. संघटनेतुन एखादं बहुमूल्य समाजोपयोगी काम उभं राहु शकेल या उदात्त हेतुने गेल्या आठ वर्षापासुन ’आम्ही अहिराणी’ या नावाच्या फेसबुक गु्रप चालविले जात असून गु्रपच्या माध्यमातून एकत्रित झालेल्या युवा तरुणाईने नुकतीच ’आम्ही अहिराणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ स्थापन केली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र येवून संस्था स्थापन करण्यात आली.
उपेक्षितांना मदत
अवघ्या खान्देशातील अहिराणी जनतेपर्यत या संस्थेचे विचार पोहोचाविण्याचे उद्दिष्ट संस्थेतर्फे ठरविण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीबांसोबतच दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी समाजाने पुढे यावे. तसेच उपेक्षीतांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावणे, गाव-खेडोपाड्यांसह शहरात दैन्यावस्थेत जीवन जगणार्यांना मानसिक बळ मिळावे खान्देशी कलावतांना व्यासपीठ मिळावे यासह अनेक चांगले उपक्रम ’आम्ही अहिराणी’ संस्थेच्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
अंधश्रध्दा निमुर्लनासाठी प्रयत्न
नाशिक येथे होत असलेल्या ’आम्ही अहिराणी’ बहुउद्देशिय संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी होणारे संपुर्ण कार्यक्रम हे अहिराणी भाषेत होणार आहे. त्यात मनोरंजन व प्रबोधनपर कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमातून अंधश्रध्दा निमुर्लनपर जनजागृती करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संदिप आहिरे यांनी सांगितले आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यकर्ते रंजन खरोटे (धुळे) प्रविण माळी (शिरपुर) खान्देश लाफ्टर शो चे राजेश खलाण (धुळे) आकाशवाणी कथाकथनकार वृषाली खैरणार आदी यावेळी मनोरंजनपर कार्यक्रम घेणार आहे.