राजसंन्यासकार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी फोडला आणि महाराष्ट्र जरा ढवळला. ब्रिगेडचे हे कृत्य तालिबानी होते असे निषेधाचे सूर जाणीवपूर्वक उमटवले आणि काही परिवर्तन करणार्या चळवळीनी ब्रिगेडची तुलना हिंदुत्ववादी शक्तींबरोबर केली. एकाच रांगेत हिंदुत्ववादी व संभाजी ब्रिगेड असे या बुद्धिवादी म्हणवणारे लोकांचे म्हणणे मला तरी अजिबात पटल नाहीय. मी काही ब्रिगेडचा वकीलपत्र घेतले नाहीय तरीही गडकरीचा पुतळा फोडण्यापर्यंत ही पोरं का सरसावली याचा जरा विचार महाराष्ट्रातील बुद्धिवादी जनता करणार का नाही या शंकेने मी ग्रासलोय. म्हणून याबाबतीत मी माझे मत मांडू इच्छितो.
पहिल्यांदा स्पष्ट करतो…कुणाचाही पुतळा फोडणे याचं मी समर्थन करत नाही. पुतळ्यांचे राजकारण व समाजकाराण दोन्ही नेहमीच संशयास्पद वाटते मला. तरीही भाषाप्रभू गडकरीचा पुतळा फोडला अन् राजापासून रंकापर्यंत अनेकांना कंठ फुटले. हे सारे कंठ महिनाभर आधी महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्या छत्रपती शिवरायांची तलवार कुणा समाजकंटकाने जाणीवपूर्वक छिन्न केली तेव्हा याचे कंठ कोणत्या गावी गेले होते कुणा ठाऊक? गडकरीच्या साहित्य सेवेबद्दल एक महाराष्ट्रीयन म्हणून मी कृतज्ञच आहे. परंतु, गडकरीचे राजसंन्यास या साहित्याचे समर्थन करणारी तोंड सरळसरळ आपल्या विवेकाशी द्रोह करत आहेत. हे नाटक अपूर्ण होतै…आजच्या पिढीला हे ठाऊक नव्हते …नाटककार म्हणून स्वातंत्र्य आहे..वगैरे वगैरे भंपकबाजी करणार्या लोकांना एवढाच प्रश्न विचारायचाय की …हे नाटक अपूर्ण होते तर मग याचाच आधार घेऊन पुढील पिढीपर्यंत संभाजीराजाची कलंकित प्रतिमा कुणी पोहोचवली? का पोहोचवली? या नाटकाचा आधार घेऊन नाटक व सिनेमा निघाले व कर्तृत्ववान राजा बदफैली ठरवला गेला तेव्हा आज विवेकवाद सांगणारी तोंड कुठे लपून बसली होती? गडकरीसमोर जो इतिहास होता त्याआधारे त्यांनी नाटक रचले हे मान्यय मला…मग सांगा नवा इतिहास उपलब्ध झाल्यावर गडकरीचे राजसंन्यास व त्यावर आधारित इतर कृती ह्या ऐतिहासिक दृष्टीने बाद ठरत नाहीत का? तसा प्रामाणिक आवाज उठवण्याचे धारिष्टय गडकरी समर्थकात नव्हते का? का वर्षानुवर्षे माझ्या शंभूराजाची बदनामी करण्यात यांनी धन्यता मानली? गडकरींचा आधार घेऊन रायगडावर काल्पनिक वाघ्या कुत्रा शिवसमाधीसमोर उभा राहिला त्यावेळी आज कंठशोष करणार्याना आनंदाच्या उकळ्या फुटल्या नाहीत का? वाघ्या कुत्रा हटाव ही मागणी किती वर्षं करायची? प्रामाणिक इतिहास संशोधक शासनाच्या दारात मागणी करून त्याचा पाठपुरावा करताहेत तर त्यांना का टोलवले जाते? ह्या न् अशा असंख्य प्रश्नांची पहिल्यांदा उत्तरं द्यावी अन् मग खुशाल त्या पोरांना योग्य ती शिक्षा करावी.
शासनाचा जाणीवपूर्वक बहिरेपणा….हितसंबंधी इतिहासकारानी लावलेली शिवचरित्राची वाट….बहुजनाच्या पोरांचे मस्तक भडकावे व त्यांच्या हातून अशी कृत्यं घडावीत म्हणून पद्धतशीर उभी असलेली यंत्रणा… इतिहास या महत्त्वाचा भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारी काही परिवर्तन चळवळी … अशा अनेकांच्या वेगवेगळ्या हितसंबंधी भूमिकामुळे ही तरुण पोरं हातात घण घेऊन उभी राहिलीत. लोकशाहीचे संमत मार्ग वापरूनही न्याय होत नाही तर आपल्या पद्धतीने कायदे हातात घेऊन न्याय करू पाहताहेत व स्वतःच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उमटवतायत यामध्ये या मुलांचे हितसंबंध कोणते हो? ही तरुण पिढी आपल्या सांस्कृतिक प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छिते तर त्याकडे डोळेझाक करणे बरे नाहीय .
संभाजी ब्रिगेडनेही….थोडा नीट विचार करावा आता. भांडारकर फोडले, पण इतिहासाची साधने गोळा करून नवे भांडारकर उभे करणे ही काळाची गरज होती. ते काम मागे सोडले. आता पुन्हा गडकरी पुतळा फोडून तुमचे ध्येय साध्य होणार का? विचार व्हावा. गडकरीनी संभाजीराजाची बदनामी केली म्हणून संभाजीउद्यानात गडकरी पुतळा नको ही भूमिका बरोबरच आहे. पण पुतळा फुटला तिथे आता ज्या सच्च्या इतिहास संशोधकानी संभाजीराजाला न्याय दिला त्यांचा पुतळा उभारायाला हवा. कमल गोखले, वा. सी. बेंद्रे अथवा शेजवलकर, जयसिंगराव पवार असे इतिहास संशोधक त्या उद्यानात दिसायला हवेत. याची जबाबदारी ब्रिगेड घेणार का? गडकरींच्या इतर साहित्य सेवेबद्दल त्यांचा सन्मान आहेच. पण त्यांच्या इतिहासज्ञानाबद्दल यापुढे कुणी मराठी भाषेचा भाषाप्रभू म्हणून प्रश्न उपस्थित करू नयेत, असे मानणे म्हणजे इतिहास आकलनाच्या विवेकाला तिलांजली दिल्यासारखे आहे. हे कदापि होऊ नये.
शेवटी..महात्मा फुलेंचा इशारा आठवतो…जोतीराव म्हणाले होते वेळीच आपले जुनाट ग्रंथ जाळून टाका..अन्यथा बहुजनाची पोरं शिकतील व त्यांच्या ध्यानात यातील लबाड्या आल्या तर ती पोरं …नुसता ग्रंथच जाळणार नाहीत तर तो ग्रंथ जवळ बाळगणार्यालाही जाळतील ..यातील फुलेंचा आशय व इशारा यांचा विचार व्हायला हवा. कोणताही इतिहास अंतिम नसतो. सतत नवनवे पुरावे समोर येतात तेव्हा ते स्वीकारून त्याप्रमाणे सर्व समाजाने आचरण करणे हेच योग्य असते. गडकरी पुतळा फोडल्याचे समर्थन नाहीच परंतु तशी परिस्थिती जाणीवपूर्वक तयार करणे हे जास्त अन्यायकारक आहे. अशा परिस्थिती वारंवार उद्भवून बहुजनांची माथी फिरवण्याचे उद्योग करणारे टोळके हेच पहिल्यांदा विवेकी समाज निर्मितीचे शत्रू आहेत एवढे नक्की .
उमेश सूर्यवंशी
9922784065