आम्ही चालवू हा पुढे वारसा

0

आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी गरुडझेप घेत पुरुषांच्या बरोबरीने नावलौकिक मिळवला आहे. पूर्वीच्या काळी ‘चूल आणि मूल’ सांभाळणार्‍या स्त्रियांनी भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत जगासमोर स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात रुपेरी पडद्यावरही जिथे स्त्री व्यक्तिरेखा साकारण्यासाठी महिला धजावत नव्हत्या, त्या महिला आज चित्रपटसृष्टीत केवळ ‘ग्लॅम डॉल’ बनून नायकाच्या मागे फिरत नाहीत, तर पडद्यामागे राहून चित्रपटांच्या तांत्रिक बाबी सुदृढ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सिनेमॅटोग्राफी ही एके काळी केवळ पुरुषांची मक्तेदारी मानली जायची, पण आज या क्षेत्रातही स्त्रियांनी बाजी मारली आहे. बी. आर. विजयालक्ष्मी यांनी 1985 मध्ये ‘चिन्ना वीडू’ या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करून महिलांना छायालेखनाचं एक नवं दालन खुलं करून दिलं. याच वाटेने जात पुढे छायालेखिका अंजुली शुक्ला यांनी ‘कुट्टी श्रंक’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरत विजयालक्ष्मी यांनी रचलेल्या पायावर कळस चढवण्याचं काम केलं.

आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बर्‍याच तरुणी छायालेखनाकडे वळत आहेत. या तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या वाटेतील अडचणी दूर करण्यासाठी महिला दिनाचं औचित्य साधत ज्येष्ठ छायालेखिका फौझिया फातिमा यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन वुमन सिनेमॅटोग्राफर्स कलेक्टिव्ह (आयडब्ल्यूसीसी) हा नवा ग्रुप सुरू करण्यात आला आहे. तरुणींमध्ये सिनेमॅटोग्राफीबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या कलेक्टिव्हचा मुख्य हेतू आहे. ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा…’ असं म्हणत या कलेक्टिव्हच्या माध्यमातून नवीन महिला सिनेमॅटोग्राफर्स घडविण्याचंही काम केलं जाणार आहे. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत ही कला पोहोचण्यास मदत होईल. या कलेक्टिव्हमध्ये आज एकूण 60 सदस्यांचा समावेश आहे. दिवसागणिक या संख्येत वाढ होत जाणार आहे. जसजशी ही संख्या वाढत जाईल तसतशी फिल्म इंडस्ट्रीतील वुमन सिनेमॅटोग्राफर्सची ताकद वाढत जाईल.

आयडब्ल्यूसीसीच्या माध्यमातून महिला सिनेमॅटोग्राफर्सना अतिरीक्त माहिती उपलब्ध होणार आहेच. त्यासोबतच अनुभवी सिनेमॅटोग्रॉफर्सचे ब्लॉग्ज, पॉडकास्ट आणि चर्चासत्रांचाही त्यांना करियरसाठी फायदा होईल. फिल्म आणि मीडिया स्कूल्समध्ये शिकणार्‍या तरुणींना ही वेबसाईट एखाद्या मार्गदर्शकाप्रमाणे काम करणारी आहे. भारतातील महिला सिनेमॅटोग्राफर्सना एकत्रित आणण्यासाठी ‘कुछ तो है’तसंच ‘मित्र माय फ्रेंड’ या चित्रपटांच्या डीओपी फौझिया फातिमा यांनी पुढाकार घेत या कलेक्टिव्हची सुरुवात केली आहे. यात सविता सिंग (हवाईजादा, व्हेंटिलेटर, फूंक), प्रिया सेठ (एयरलिफ्ट, शेफ, बारह आना), दीप्ती गुप्ता (हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., द फकिर ऑफ व्हेनिस), प्रीता जयरामन (ओगॅरन, अन समया अराइल, गौरवम), अर्चना बोर्‍हाडे (फुंतरू) या चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या महिला सिनेमॅटोग्राफर्सचा समावेष आहे. या कलेक्टिव्हच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणींनी एकत्र येऊन सिनेमॅटोग्राफीसारख्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवत स्वत:ला सिद्ध करावं यासाठी आजच्या महिला सिनेमॅटोग्राफर्सनी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहेच, त्यासोबत इतर क्षेत्रांमधील महिलांसाठीही मार्गदर्शक आहे.