नागपूर (हिवाळी अधिवेशनातून)- 5 तारखेपासून नागपूरच्या गुलाबी थंडीत रंगलेल्या हिवाळी अधिवेशनाची सांगता आज झाली. हिवाळी अधिवेशनाचे पहिल्या आठवड्यात बरेचसे कामकाज वाया गेल्यानंतर दुसर्या आठवड्यात खासकरून शेवटच्या तीन दिवसांमध्ये कामाचा अक्षरश: फडशा पाडला गेला. शेवटच्या तीन दिवसात महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. या चर्चेने निश्चितच जनतेसह सदस्यांचे आणि आमचेही समाधान झाले नाहीच. कारण जनसामान्यांच्या प्रश्नांवर अधिकचा वेळ देण्याऐवजी केंद्राचा निर्णय असलेल्या नोटाबंदीवर उगाच एरंडाचे गुर्हाळ गाळले गेले. नोटबंदीच्या प्रकरणात राज्यातील दोन्ही सभागृहात काहीही धोरणात्मक निर्णय होऊ शकत नाही याची कल्पना असतानाही या चर्चेवर नाहक वेळ वाया घालवला गेला. दुसरा मुद्दा मराठा आरक्षणाचा. 14 च्या मोर्चाची हवा असल्याने मराठा आरक्षणावरही काही निर्णय होईल या भाबड्या आशेवर बसलेल्या समाजाला आता न्यायालयाच्या निर्णयाचीच वाट बघण्याखेरीज पर्याय नाही. निर्णय न्यायालयच देणार असेल तर प्रश्न असा पडतो की, या मुद्द्यावर अधिवेशनात एवढा किस का पाडला गेला? सभागृह बंद का केली? मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर चुपचाप झालेल्या विरोधकांनी देखील यावर चिंतन करणे आवश्यक आहे. सरकारला तर या विषयावर निर्णय घेणे आता अतिआवश्यक झाले आहे, कारण वारंवार आश्वासनांचीच खैरात देऊन आता आश्वासन द्यायलाही सरकारकडे काही उरलेलं दिसून येत नाही.
बाकी आज शेवटचा दिवस भरगच्च विषयांनी युक्त असणारा होता. अगदी वेळापत्रकाला साजेसे काम करताना आज दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा चालली. अनेक लक्षवेधींवर विस्तृत चर्चा झाली. अनेक सदस्यांना औचित्य आणि विशेष उल्लेखात आपले विषय मांडायला संधी मिळाली. बाकी आज सकाळपासूनच अनेकांना परतायची घाई असल्याने सायंकाळ पर्यंत सभागृह खाली-खाली दिसून येत होते. बाहेरही पत्रकार आणि सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर तिकीट कन्फर्मचे हसू दिसत होते तर अनेकांच्या चेहर्यावर कन्फर्म न झाल्याची निराशा दिसून येत होती. अधिवेशनाचा कंटाळा आलेल्यांच्या चेहर्यांवर जरा अधिकची निराशा स्पष्ट दिसत होती. तर शेवटचा दिवस असल्याने बाहेर सेल्फी आणि फोटोग्राफीचा जोर जरा अधिकच वाढलेला दिसून आला. सगळीकडे आवराआवरीचा माहोल दिसून येत होता. आतमध्ये आतापर्यंत बंदी असलेल्या गाड्यादेखील सामान नेण्याच्या कारणाने आत येऊ लागल्या होत्या. अर्थातच सर्वांनाच घरवापसी करण्याची जास्तच घाई लागलेली दिसत होती.
बाकी अधिवेशन गाजले ते नोटाबंदी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवरूनच. विदर्भात अधिवेशन असल्याने वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याने अधिवेशन चालेल की नाही ही भावना घेऊन आलेल्या लोकांचा फार हिरमोड झाला. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवशीही जोरदार बॅटिंग करत विरोधी पक्षांनी लावलेले सगळे आरोप एक- एक करत खोडून काढत सिक्सरवर सिक्स मारले. ‘जे इथे मंजूर झालं ते झालं आणि राहिलेलं मार्चमध्ये बघू’ असं म्हणत हातवारे करत फ्लाईटचा टाईमिंग एकमेकांना सांगितला जात होता. एकंदरीत अधिवेशनाच्या शेवटच्या तीन दिवसात चाललेल्या चर्चा आणि मंजूर विधेेयकांची संख्या पाहता अधिवेशन गोडच झालं असं मानून धन्य होणेच आपल्या हाती आहे.
निलेश झालटे
9822721292