नवी दिल्ली । किर्गीस्थानमध्ये आयोजित आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत पंकज अडवाणी याच्या नेतृत्वाखालील भारतीय स्नूकर संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करून विजेतेपद मिळवले. या विजयानंतर अडवाणीनं ट्विट करत चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारणार्या भारतीय क्रिकेट संघाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आम्ही क्रिकेटर नाहीत, तर आम्ही यंदाचे आशियाई स्नूकर चॅम्पियन्स आहोत, असं ट्विट अडवाणीने केले आहे. आपल्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या तुलनेत इतर खेळ आणि खेळाडूंना खूपच कमी महत्त्व दिले जातें, असे म्हटले जाते.
प्रसारमाध्यमांमधूनही क्रिकेटपटूंकडेच अधिक लक्ष वेधले जाते. त्या पार्श्वभूमीवर आशियाई स्नूकर चॅम्पियन्स ठरलेल्या भारतीय स्नूकर संघाचा खेळाडू पंकज अडवाणीने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून दारूण पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर अप्रत्यक्ष नशाणा साधला आहे. आम्ही हिरो किंवा आम्ही क्रिकेटर नाहीत. पण आम्ही आशियाई स्नूकर चॅम्पियन्स आहोत, असं ट्विट अडवाणीने केले आहे. किर्गीस्तानच्या बिश्केक शहरात पार पडलेल्या आशियाई सांघीक स्नूकर स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर मात केली आहे. पंकज अडवाणी आणि लक्ष्मण रावत यांच्या भारतीय संघाने पाकिस्तावर मात करत विजेतपद पटकावलं आहे.पहिल्या स्पर्धेत पंकज अडवाणीला मोहम्मद बिलालविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. मोहम्मद बिलालने पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली होती. या सेटमध्ये पंकजकडून काही चुका झाल्या ज्याचा फायदा बिलालला झाला. मात्र त्यानंतर पंकजने सामन्यात पुनरागमन करत बरोबरी साधली. आपली पहिली आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या लक्ष्मण रावतवर भारताचा विजय अवलंबून होता.