वाडा – महाराष्ट्रातील एक आक्रमक नेतृत्व म्हणून ख्याती असणारे नारायण राणे हे येत्या काही दिवसात राजकीय भुकंप घडविणार असून राणे साहेब जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत आम्ही सर्वशक्तिनिशी ठामपणे राहू, असा निर्धार स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश (बंटी) पाटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांच्या महत्त्वाच्या राजकीय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश (बंटी) पाटील यांनी वाड्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
सर्व कार्यकर्ते एकदिलाने राणेंच्या पाठीशी राहणार
नारायण राणे साहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असून भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत ते जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हालाही मान्य असेल. आमदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाने व आमचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटना गेली अनेक वर्षे पालघर जिल्ह्यातील तळागाळातील जनतेसाठी काम करीत आहे. त्यामुळे हजारो तरुण या संघटनेत आज कार्यरत आहेत. हे सर्व कार्यकर्ते एकदिलाने यापुढेही राणे साहेबांच्या सोबत ठामपणे राहणार आसल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी बोलताना दिला. या पत्रकार परिषदेला स्वाभिमानचे जिल्हा संपर्क प्रमुख रोशन पाटील, सल्लागार अशोक पाटील, वाडा तालुका अध्यक्ष रविंद्र मेणे उपस्थित होते.