आम्ही महागाईचे लाभार्थी!

0

गेल्या सव्वा वर्षात किरकोळ बाजारातील महागाईने उच्चांक गाठला आहे. औद्योगिक उत्पादनही गेल्या तीन महिन्यांत घसरले आहे. नोटाबंदीपासून सुरू झालेली अर्थव्यवस्थेची घरघर जीएसटी अंमलबजावणीतील गोंधळामुळे आणखी वाढली. घाऊक महागाई निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 3.24 टक्के इतका नोंदला गेला. जुलै महिन्यात हा दर 1.88 इतका होता. एकूणच महागाईलाच अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. त्यात पेट्रोल-डिझेलचे दर उसळतच आहेत. विकासदरात वृद्धी झाल्याचा सरकार नुसताच गाजावाजा करत असले, तरी शेवटी महागाईने कंबरडे मोडलेले सर्वसामान्य महागाईचे ‘लाभार्थी’ ठरलेत.

गेल्याच महिन्यात ‘मूडीज’ने वाढवलेली मानांकने वाढले असल्याचे अर्थमंत्री जेटलींनी मोठ्या बडेजावात सांगितले. मात्र, आता महागाईने उच्चांक गाठल्याने हे दावे फोल ठरले आहेत. नोव्हेंबरमध्ये महागाईच्या दरात 4.88 टक्केइतकी घसरण झाली आहे, तर ऑक्टोबरमध्ये तो 2.2 टक्के होता. हाच दर ऑगस्ट 2016 ला 5.05 टक्केइतका सर्वाधिक होता. रिझर्व्ह बँकेचा महागाईचा दर 4 टक्के ठेवण्याचे लक्ष्य आहे. महागाई वाढल्याने भाज्यांचे दर 22.48 टक्के, तर फळांचे दर 6.19 टक्केइतके झाले आहेत. एका वर्षात कच्चा तेलाची किंमत 28 टक्क्यांनी वाढली असून 48 कर्मचार्‍यांचा एचआरए वाढल्यानेही महागाईवर मोठा परिणाम झाला आहे. औद्योगिक उत्पादन घसरण्याची दोन मुख्य कारणे आहेत.

यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या दरात घट होऊन ती 2.5 टक्के आली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2016 ला तो 4.8 टक्के आणि सप्टेंबर 2017 ला ती घट 3.58 टक्केइतकी होती, तर दुसरे कारण म्हणजे माइनिंग वाढदेखील 0.2 टक्के स्थिर राहिली असून, ती ऑक्टोबर 2016 ला 1 टक्के तर सप्टेंबर 2017 ला 7.9 टक्के इतकी होती. एकीकडे कपडे आणि पादत्राणांमधील महागाई घटली असून, ती 4.76 टक्क्यांवरून 0.64 टक्क्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, डाळींच्या किमती घटण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. नोव्हेंबर 2017मध्ये डाळींच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 23.53 टक्क्यांनी घटले आहे. देशभरातील प्रमुख घाऊक बाजारामध्ये फळभाज्या, फुले आणि फळे यांच्या किमती ऑगस्ट महिन्यात दुपटीहून अधिक वाढल्या. महाराष्ट्रात टोमॅटो, कांदा, पालेभाज्या दिल्लीमध्ये कांद्यासोबत भेंडी, पपई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये प्रमुख भाज्यांसोबत चिकूच्या किमती वाढल्या. या सगळ्यांचा परिणाम महागाई निर्देशांक वाढण्यात झाला.महागाईचा इतिहास डोकावून पाहिला तर गेल्या 40 वर्षात 150 पटीने महागाई वाढली आहे. 1934 ते 1944 या काळात जीवनावश्यक वस्तूंचा दर मांडल्यास पेट्रोल एक रुपयास एक गॅलन म्हणजे 20 पैसे लीटर, तर रॉकेल एक रुपयास चार गॅलन होते. मागील 75 वर्षांपूर्वी सोने 40 रुपये, तर चांदी 2 रुपये तोळा होती. तेव्हा मजुराला प्रती दिवस चार आणे मजुरी मिळायची. 40 वर्षांपूर्वीचे दिवस आठवल्यास दीडशेपट महागाई वाढल्याचे दिसून येते. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतीत जगभरातील रेटिंग एजन्सी चांगले पतमानांकन देत असतानाच दुसरीकडे मात्र अर्थव्यवस्थेच्या वाढीला घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई स्थिरावली होती. अन्नपदार्थ आणि इंधनदरात झालेल्या वाढीमुळे नोव्हेंबरअखेर किरकोळ महागाईचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. याशिवाय देशाच्या औद्योगिक उत्पन्नात सातत्याने होणारी घसरणही चिंतेचा विषय बनली आहे. उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे ऑक्टोबरअखेर औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांक (आयआयपी) 2.2 टक्क्यांवर पोहोचला. सप्टेंबरअखेर आयआयपी 3.8 टक्के होता. मंगळवारी केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये महागाईचे प्रमाण रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेलल्या मध्यम मुदतीच्या उद्दिष्टापेक्षा (4 टक्के) पुढे गेल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई आटोक्यात ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. आपल्याकडे जादूची कांडी आहे व ती फिरवताच आपण जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करू, असे आभासी चित्र उभे केले होते. मात्र, हा केवळ आभासच राहिला आहे. कारण सध्या महागाई दिवसेंदिवस भडकत चालली आहे. सर्वसामान्यांना त्यांचे जीवन हैराण झाले आहे.

अशा प्रकारची महागाई काँगे्रसच्या राज्यात तर होती आता भाजपच्याही राज्यात कशी, असा प्रश्‍न बिचार्‍या जनतेलाही भेडसावत आहे. एकूणच महागाईलाच अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. त्यात पेट्रोल-डिझेलचे दर उसळतच आहेत. विकासदरात वृद्धी झाल्याचा सरकार नुसताच गाजावाजा करत असले, तरी शेवटी महागाईने कंबरडे मोडलेले आहे. महागाईसाठी सरकार ‘ओखी’ वादळाचा तडाखा याकडेही बोट दाखवले जात आहे. ही कारणे मान्य केली तरी महागाईने जो उच्चांक गाठला आहे तो मागील 15 महिन्यांतील आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

– अमोल देशपांडे
वृत्त समन्वयक, जनशक्ति, मुंबई
9987967102