मुंबई: विधानसभा निवडणूक एकत्रित लढल्यानंतर मात्र मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेत बिनसले. त्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत सत्ता स्थापन केले. सत्ता स्थापन होऊन ८ महिने उलटले मात्र अजूनही भाजपने शिवसेनेसोबत जाण्याची तयारी ठेवली आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यासाठी तयार आहोत असे मोठे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
शिवसेनेसोबत जाण्याची तयारी असली तरी निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे आता राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
राज्याच्या हितासाठी केंद्रीय नेतृत्वाने फॉर्म्युला तयार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तो फॉर्म्युला मान्य झाला तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना सध्या हवेत आहे. ते एकत्र यायला तयार होतील, असे वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
आमच्याकडे १०५ आमदार आणि शिवसेनेकडे ५६ आमदार आहेत, ते मुख्यमंत्रिपद मागूच कसे शकतात? असा सवाल त्यांनी केला.