नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कायदा अर्थात जीएसटी लागु झाल्यानंतर देशभरातील बाजारांमध्ये खळबळ माजली आहे. काही वस्तुंच्या किंमती कमी तर काहींच्या अव्वाच्या सवा वाढल्या आहेत. यातच स्वयंपाकाचा सिलिंडर जवळपास ३२ रूपयांनी वाढल्यामुळे सामान्य माणसाला मोठाच झटका बसला आहे. जीएसटीचा जाच आणि वर सिलिंडरवची सबसिडी कमी करणे या निर्णयांमुळे सिलिंडरची किंमत आणखी वाढणार आहे. अतिरिक्त सिलिंडरही १८ टक्के कराच्या टप्प्यात येणार आहेत.
जून २०१७ पासून सिलिंडरच्या सबसिडीमध्ये घट केल्यामुळे ग्राहकांवर बोजा पडणार आहे. नव्या अधिसूचनेनुसार १०७ रुपयेच बँक खात्यात जमा होणार आहेत. या दोन्हींचा परीणाम असा होणार आहे की प्रत्येक सिलिंडरमागे आता ३२ रूपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे राज्याराज्यांमध्ये सिलिंडरची किंमत तिच राहणार नाही.
एलपीजी पाच टक्के कर टप्प्यात
जीएसटी लागू होण्याआधी अनेक राज्यांना एलपीजीवर कर द्यावा लागत नव्हता. काही राज्यांमध्ये दोन ते चार टक्के इतका व्हॅट कर लावला जात होता. जीएसटीचे ०, ५, १२, १८ असे टप्पे आहेत. एलपीजीला पाच टक्के टप्प्यात टाकला आहे. त्यामुळे १२ ते १५ रूपयांची वाढ होईल.
व्यापारी वापराचा सिलिंडर स्वस्त
जीएसटी व्यापारी वापराच्या सिलिंडरसाठी मात्र फायदेशीर ठरला आहे. पूर्वी २२.५ टक्के कर व्यापारी वापरकर्त्यांना भरावा लागत असे. आता व्यापारी सिलिंडर १८ टक्केच्या टप्प्यात टाकल्यामुळे ६९ रूपयांनी किंमत कमी झाली आहे.
सामान्य माणसाला जीएसटीचा दुप्पट मार
चुलीच्या धूराच्या दुष्टचक्रातून सुटू पहाणाऱ्या सामान्य माणसाला नवीन गॅस जोडणी घ्यायची झाली तर कागदपत्रांचा खर्च, प्रशासनिक खर्च आणि जोडणी खर्च असणार आहे. जोडीला सिलिंडरची वाढीव किंमतही सोसावी लागणार आहे.