पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीतर्फे महाराष्ट्रात सतरा जागा लढविल्या जाणार असून पुण्यातून असीम सरोदे हे त्या पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. माहिती-अधिकार क्षेत्र, पुरोगामी चळवळीशी सरोदे यांचा संबंध असून या चळवळीतील वेगवेगळ्या गटांचा सरोदे यांना पाठिंबा आहे त्यामुळे त्यांचे नांव चर्चेत आहे. वंचित विकास आघाडीचाही त्यांना पाठिंबा मिळेल असे मानले जाते. आम आदमी पार्टीच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षापुढे मात्र मतविभाजनाचा धोका उभा रहातो.
आम आदमी पार्टीने 2014मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी पुण्यातून समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे यांना या पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. मोदी लाटेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. सुमारे 25,000 मते त्यांना मिळाली होती. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यांना मिळालेल्या मतांमध्ये समाजवादी विचारांच्या मतदारांचे प्रमाण जास्त होते. ही मते याही वेळेला आम आदमीला मिळाल्यास काँग्रेसचे नुकसान होणार आहे.दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची आघाडी होऊ शकलेली नाही. बोलणी फिस्कटल्यावर आम आदमी पार्टीने काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. हे वातावरण पहाता पुण्यातही आपचे काँग्रेसला सहकार्य रहाणार नाही.