आम आदमी योजनेपासून वंचित वारसांना न्याय द्या

0

चाळीसगाव । तालुक्यातील आम आदमी विमा योजनेतील मयत झालेल्या दावा प्रकरणांच्या वारसांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासकिय मदतीतून हातभार लागावा. तालुक्यातुन 60 ते 65 वारसांनी दावा प्रकरणे सादर केलेली आहेत. या दावा प्रकरणांचा वारसांना न्याय मिळावा म्हणून 27 मार्च 2017 रोजी तालुक्यातील ओझर येथील लाभार्थी व बाजीराव गुजर यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले होते. मात्र आश्‍वासनानंतर मागे घेतले.

2011 पासूनची प्रकरणे होती पडून
तालुक्यातील ओझर येथील मृत प्रमुखांच्या वारसांनी 2011पासून आम आदमी विमा योजनेतून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा यासाठी ओझर गावातून 8 व तालुक्यातून 60 ते 65 वर्षांनी दावा प्रकरणे सादर केली होती. मात्र त्या प्रस्तावांचे पुढे काय झाले याची माहिती नसून तहसिल कार्यालयामार्फत काहीही पाठपुरावा झालेला नाही. सदर दाखल प्रस्ताव संबधीत आयुर्विमा महामंडळ नाशिक कार्यालयाकडे पोहच झालीच नसल्याचा आरोप सदर वंचित वारसदारांनी केला असुन अनेक वर्षांपासून गरजूंना शासकीय योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात येत आहे.

आंदोलनात यांचा सहभाग
बाजीराव गुजर यांच्यासह मधुकर गुजर, साहेबराव गुजर, शांताराम अहिरे, सागर गुजर, रवींद्र शिंपी विजय पाटील, आदींनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास लोकसंघर्ष मोर्चाचे सोमनाथ माळी, कारभारी पवार, चंद्रसिंग मोरे, गोरख पारधी यांनी पाठींबा दिला होता. संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार श्री वाघ यांनी सदर वर्षांचे प्रस्ताव नव्याने सादर करून मंजूर करू, असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील व प्रमोद पाटील उपस्थित होते.