रोबो वॉरमध्ये पाच देशांच्या 48 संघांचा सहभाग, लाखाचे बक्षीस जिंकले
भुसावळ : आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘रोबो वॉर’ तंत्रज्ञानात भुसावळचे नाव उंचावणार्या ‘टीम ब्लँका बोट्स’ने सलग दुसर्या वर्षी आयआयटी मुंबईतील मानाची ‘टेकफेस्ट 2018’ ही स्पर्धा जिंकली आहे. चीन, रशिया, ब्राझील आदी रोबोटीक्स तंत्रज्ञानात पुढारलेल्या देशांचे एकूण 48 संघ सहभागी झाले असतानाही टीम ब्लँकाने अंतिम सामन्यात छत्तीसगडमधील दुर्ग येथील संघाला नमवून एक लाखांचे बक्षीस जिंकले.
ड्रॅगनला नमवत गाठली अंतिम फेरी
संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या टीम ब्लँका बोट्सच्या ‘तानाजी’ आणि ‘दारा’ या रोबोंनी चीनमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबो वॉर स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. यानंतर ही टीम 54 किलो वजनाचा ‘तानाजी’ हा रोबो घेवून 26 ते 28 डिसेंबरदरम्यान माटुंगा येथील ‘व्हीजेटीआय टेक्नोवंझा’ स्पर्धेत उतरली. येथे त्यांनी औरंगाबादच्या एमआयटीच्या कॉलेजच्या कार्गो टीमला धूळ चारून एक लाखाचे बक्षीस जिंकले. यानंतर 29 व 30 डिसेंबरला आयआयटी मुंबईत झालेल्या टेकफेस्टमध्ये तानाजीने सर्व सहा सामन्यात प्रतिस्पर्धी रोबोची धूळधाण उडवली. येथेही त्यांनी लाखाचे बक्षीस जिंकले. भारतासह चीन, रशिया, ब्राझील, बांग्लादेश या देशांतील 48 संघ त्यात सहभागी होते. स्पर्धेत ब्लँका बोट्सच्या तानाजीने पहिल्या सामन्यात रशियाच्या सोलर रोबोचा पराभव केला. यानंतर त्यांनी पुणे येथील आरडीएक्स व पुन्हा रशियाच्या एनर्जी या रोबोला धूळ चारली. उपांत्य सामन्यात चीनच्या ‘ब्लडी आय’ या रोबोला अवघ्या 30 सेकंदात पाणी पाजून अंतिम फेरी गाठली. येथे त्यांनी दुर्ग (छत्तीसगड) येथील संघाच्या ‘स्वॅग’ या रोबोला 5 मिनिटांत पराभूत केले.
यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.गजानन जाधव, प्रा.जितेंद्र चौधरी, प्रा.नितीन खंडारे, प्रा.अनंत भिडे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.धीरज पाटील, एस.बी. बरकले, जी.एम.बावस्कर, बी.जी.खोब्रागडे, पी.आर.चिलवंते, एस.के.नगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयोजनात सहभाग
रोबो वॉर अरेनाचे हे 9वे वर्ष आहे. त्यात भुसावळ येथील संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या ब्लँका बोट्सने सहभाग नोंदवून गतवर्षीचे अजिंक्यपद कायम ठेवले. विशेष म्हणजे या टीमचा सदस्य आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा विद्यार्थी अक्षय जोशी याच्या टँलेंटची दखल घेत टेकफेस्टच्या आयोजनामध्ये त्याच्याकडे प्रकल्प प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती.