नवी दिल्ली । हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी दिल्लीने पहिल्यांदाच एका कंपनीसोबत मिळून विशेष अशा सिमेंटची निर्मिती केली आहे, जे ऊर्जा उत्सर्जन 30 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. लाइमस्टोन कॅल्साइंड क्ले सिमेंट (एलसी3) असे या आयआयटीच्या सिव्हिल इंजिनियरिंगच्या पथकाने निर्माण केलेल्या उत्पादनाचे नाव आहे. या सिमेंटसाठी संशोधन करताना आयआयटीला काँक्रिटसाठी नवा मिश्रण पदार्थ मिळाला आहे, जो याची मजबुती 20 टक्क्यांनी वाढवेल. यामुळे काँक्रिटमध्ये महागडे सिमेंट मिळविण्याची गरज कमी होऊन खर्चात घट येईल.
या नव्या सिमेंटची पूर्णक्षमतेने उत्पादन चाचणी आयआयटीने केली असून याचे निष्कर्षदेखील चांगले आले आहेत. पथकाला काँक्रिटमध्ये मिसळविण्यासाठी एक पर्यावरण अनुकुल मिश्रण मिळाले आहे, ज्यामुळे काँक्रिटची कामगिरी कमी किमतीतच वाढणार आहे. पहिल्यांदाच कोणत्याही सिमेंट कंपनीसोबत मिळून एखाद्या शैक्षणिक संस्थेने मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले आहे. सरकारसोबत याचा वापर गृह योजनांसाठी व्हावा यासाठी पथक प्रयत्न करत आहे.
पर्यावरण अनुकुल सिमेंट बनविण्यासाठी आयआयटी दिल्ली 2013 पासून काम करत असून याकरता स्वीत्झर्लंडकडून देखील अर्थसहाय्य झाले आहे. तेथे देखील याच सिमेंटवर संशोधन सुरू असून दिल्लीतील स्वीस दूतावासाची इमारत देखील याचद्वारे उभारण्यात आली आहे. आयआयटी दिल्ली या सिमेंटकरता जेके लक्ष्मी सिमेंट कंपनीसोबत काम करत आहे. शैक्षणिक संस्थेच्या पथकाच्या संशोधनकार्यावर कंपनीने मागील वर्षी आपल्या झज्जर प्रकल्पात सिमेंटचे उत्पादन घेतले होते. सिमेंटची पूर्ण प्रमाणात चाचणी उत्पादन घेणारी ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे.
सिमेंट उत्पादनावेळी इंधन जाळल्याने लाइमस्टोन ऑक्साईडमध्ये रुपांतरित होते. यामुळे कार्बन डायऑक्साईडचे मोठया प्रमाणात उत्सर्जन होते. या उत्सर्जनामुळे पर्यावरणाला मोठा धोका राहतो. पंतु आयआयटी तज्ञांनुसार एलसी3 हे उत्सर्जन खूपच कमी करू शकते. या विशेष सिमेंटवर आयआयटीच्या या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे सिव्हिल इंजिनियरिंग विभागाचे डॉ. शशांक बिश्नोई यांनी ही पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक सामग्री असल्याचे म्हटले. कोणतीही शैक्षणिक संस्था आणि सिमेंट कंपनीदरम्यान हा पहिला संयुक्त उपक्रम आहे.