आयएएसपदी हिरालाल सोनवणे यांची निवड

0

जळगाव – जामनेर तालुक्यातील काळखेडे येथील राहिवासी असणारे हिरालाल सापुर्डा सोनवणे यांची आय.ए.एस.पदी केंद्र शासन व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदोन्नती होऊन भारत प्रशासन सेवेतील 2011 च्या बॅचमध्ये त्यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. हिरालाल सोनवणे यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला. परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्दीने व मेहनतीने शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1992 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. त्यांचे आईवडील अशिक्षीत असूनदेखील शिक्षणाचे महत्व समजून घेवून त्यांनी आपल्या तिनही मुलांना शिक्षित केले. त्यांचे बंधू शांतीलाल सोनवणे हे उपजिल्हाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर छोटे बंधू ज्ञानेश्‍वर सोनवणे हे वन परिक्षेत्र अधिकारी पनवेल येथे कार्यरत आहेत.

विविध ठिकाणी बजावली सेवा
हिरालाल सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळेमधून प्राथमिक शिक्षण काळखेडे, वाघारी येथून तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल येथून घेतले. गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक येथून डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बी.ए. व एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नोकरीत असताना सिध्दार्थ कॉलेज, मुंबई येथून एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. हिरालाल सोनवणे यांची 1990 – 1992 या कालावधीमध्ये आयोगामार्फत विविध पदांवर निवड झाली. विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक मंत्रालय, समाजकल्याण निरीक्षक, मुख्य अधिकारी वर्ग 2, नगरपालिका, वित्त व लेखा अधिकारी वर्ग 1 तसेच उपजिल्हाधिकारी म्हणून 1992 मध्ये निवड झाली.

हिरालाल सोनवणे हे प्रथम फार्मासिस्ट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी, ता.जामनेर येथे दीड वर्षे कार्यरत होते. त्यानंतर केंद्र शासनाच्या सी.जी.एच.एस.पुणे येथे पाच वर्षे फार्मासिस्ट व स्टोअरकिपर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रावेर, जि.जळगाव येथे कार्यरत होते. त्यानंतर प्रांताधिकारी नंदुरबार व प्रांताधिकारी शिरपूर या पदावरदेखील त्यांनी कामकाज केले. पुढे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मंत्रालयात कार्यरत होते. त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई शहर, अपर जिल्हाधिकारी मुंबई, अपर जिल्हाधिकारी अतिक्रमणे व निष्कासन मुंबई, अपर विभागीय आयुक्त नाशिक अशा विविध पदावर काम करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सद्यपरिस्थितीत ते अपर विभागीय आयुक्‍त कोकण विभाग मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.