आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतली एका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

0

लातूर – वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईसोबत लोकांच्या घरची धुणी-भांडी करत दहावीच्या बोर्ड परीक्षेत अश्विनी हंचाटे हिने ९४.४० टक्के गुण मिळवले आहेत. भविष्यात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेऊन गोर-गरिबांना आरोग्य सेवा देण्याचा मानस अश्विनीचा आहे. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला. लातूर मनपाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेत अश्विनी हंचाटे या विद्यार्थीनीची डॉक्टर होईपर्यंतची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवेगावकर यांनी बुधवारी अश्विनी हंचाटेला आपल्या निवासस्थानी निमंत्रित करुन तिचे अभिनंदन केले. अश्विनीला आपला संपूर्ण वेळ अभ्यासासाठी देता यावा याकरता अश्विनीची राहण्याची व्यवस्था शहरातील वैदिका गर्ल्स वसतीगृहात करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयुक्तांनी अश्विनीच्या उज्वल भविष्यासाठी ज्या प्रमाणे मदतीचा हात पुढे केला, त्याप्रमाणे प्रत्येक सनदी अधिकाऱ्यांनी याची पुनरावृत्ती केल्यास आर्थिक परिस्थिमुळे शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या अशा कितीतरी अश्विनी आपल्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर आपले भवितव्य घडवत यशाचे शिखर गाठतील यात शंका नाही.

कौस्तुभ दिवेगारकर यांनी जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कामकाज पहिले आहे.