आयएएस अधिकार्‍यांचा मृतदेह मिळाला

0

लखनऊ । हजरतगंज या उच्चभ्रु परिसरातील मीराबाई गेस्ट हाऊसबाहेर एक आयएएस अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. या मृत आयएएस अधिकार्‍याचे नाव अनुराग तिवारी असून ते कर्नाटक कॅडरचे आहेत. मीराबाई गेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती सकाळी मिळाली. घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्रावरुन मृतदेह आयएएस अनुराग तिवारी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. अनुराग तिवारी उत्तर प्रदेशातील बहराईचचे रहिवासी होते. बंगळुरुच्या खाद्य आणि पुरवठा विभागाचे आयुक्त होते. अनेक वरिष्ठ अधिकारी मीराबाई गेस्ट हाऊसवर पोहोचले असून तपास सुरु आहे. त्यांचे फोन कॉल्सही तपासले जात आहेत. अनुराग तिवारी यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनुराग तिवारी 2007 बॅचचे आयएएस होते. तिवारी यांचा 2008 मध्ये विवाह झाला होता. महिनाभरानंतर लगेचच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रस्त्यावर पडल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आणि डोक्याला जखम झाली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शिवाय अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ते जखमी झाले असावेत, असाही अंदाज आहे.