आयएमएतर्फे भ्याड हल्याचा निषेध; हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

0

जळगाव । प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने मेहरुणमधील हुमेरा शेख या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी ममता हॉस्पीटलची तोडफोड केली. हॉस्पीटलवरील भ्याड हल्याचे निषेध करीत संशयितांना अटक करण्याचे साकडे पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याकडे आयएमएच्या पदाधिकार्यांनी निवेदनाव्दारे घातले.

मेहरुणमधील हुमेराबी यांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ऍपेक्स हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांकडे पैशांची मागणी केली व न दिल्यास उपचार करणार्या डॉ. शाहिद खान यांच्या हॉस्पिटलची तोडफोड करु अशी धमकी दिली. पैशे देण्यास नकार दिल्याने हॉस्पिटल येथे भ्याड हल्ला करुन केलेली दगडफेक व नासधुस हा प्रकार अतिशय निंदनीय व लांछनास्पद असल्याचे आयएमएच्या निवेदनात म्हटले आहे. नातेवाईकांच्या अश्या वागण्यांचे भ्याड हल्ला करुन दहशत फैलवण्याचे कृत्य अतिशय घृणास्पद व निंदनीय असल्याचे आयएमएच्या निवेदनात म्हटले आहे.

हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा
आयएमएतर्फे घटनेचा निषेध करीत पोलीस प्रशासनाने केलेल्या समयोचित तत्पर कारवाई व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त आयएमच्या पदाधिकार्यांनी केले. तसेच संबधित हल्लेखोरांवर लवकरात लवकर कायदेशीरा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुरावा कमी करणेसाठी योग्य तो उपाययोजना, समाज प्रबोधन व कायद्यात संशोधन यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हावेत अशी मागणी आयएमच्या पदाधिकार्यांनी केली. यावेळी अध्यक्ष डॉ.विश्‍वेश अग्रवाल, सचिव डॉ.राजेश पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ.जितेंद्र कोल्हे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.