कोलकाता । अॅटलेटीको डी कोलकाताचे मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांनी सांगितले की हिरो इंडियन सुपर लिगच्या सामन्यांना उपस्थित राहणार्या प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येमुळेच मी भारतात येण्यास सहमती दर्शविली. सुरवातीला मी काहीसा साशंक होतो. एका संघाला मार्गदर्शन करायचे म्हणून भारतापर्यंत लांब जाण्याची गरज आहे का, असा प्रश्न मी स्वतःला विचारला होता. नंतर मात्र मी स्टीव कॉप्पेल (जमशेदपूर एफसीचे मुख्य प्रशिक्षक) आणि अर्थातच डेव्हीड जेम्स (केरळा ब्लास्टर्स एफसीचे माजी मुख्य प्रशिक्षक) यांच्याशी चर्चा केली. हिरो आयएसएलविषयी सांगण्यासारख्या चांगल्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. आम्ही साठ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळू असे मला सांगण्यात आले. अशाच वातावरणात संघाला मार्गदर्शन करायला आवडेल असा विचार माझ्या मनात आला. मँचेस्टर युनायटेडच्या या माजी स्ट्रायकरने कोलकात्यात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. सलामीचा सामना सोपा असता तर आवडले असते का, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शेरींगहॅम यांनी ब्लास्टर्सविरुद्ध सलामी होण्यातील फायदे अधोरेखित केले.
ही लढत म्हणजे गत मोसमातील अंतिम सामन्याची पुनरावृत्ती असेल. त्यावेळी एटीकेने पेनल्टीवर 4-3 अशी बाजी मारली होती. 51 वर्षांचे शेरींगहॅम म्हणाले की, अशाच वातावरणात प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध डावपेचांच्या आखणीसाठी आपल्या मेंदूचा कस लागावा असे मला वाटते. हे अवघड असेल, पण 60 हजार प्रेक्षक प्रतिस्पर्ध्याला प्रोत्साहन देत असताना आम्ही चांगला खेळ करू शकलो तर ते फार उत्तम असेल.गेल्या काही मोसमांत एटीके विरुद्ध ब्लास्टर्स अशी चुरस वाढली आहे. पाच सामन्यांत एटीकेने दक्षिणेकडील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभव पत्करलेला नाही. शेरींगहॅम यांनी एटीकेच्या मोहीमेसमोरील सर्वांत मोठा धोका म्हणून ब्लास्टर्सचा उल्लेख केला.