आयएसओ मानांकित आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल

0

शेंदुर्णी । येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उत्कृष्ठ सेवेबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे दीड वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन देऊन गौरविण्यात आले होते. तत्कालीन आरोग्य अधिकार्‍यांचा जिल्हा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील आयएसओ मानांकन प्राप्त आरोग्य केंद्रामध्ये सध्या असलेल्या सोयी सुविधामध्ये सुधारणा करून जास्तीच्या अतिरिक्त सोयी सुविधा रुग्णांना पुरविण्यात येतील असे जाहीरपणे पुरस्कार वितरण प्रसंगी सांगण्यात आले होते. सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन जिल्हा परिषद प्रशासन व उपस्थीत पदाधिकारी यांनी दिले होते. 40 हजार लोकवस्ती असलेले शेंदुर्णी गांव व परिसरातील13 खेड्यातील 25 हजार नागरीक व शालेय विदयार्थी असे 65 हजार नागरिकांचे आणि राज्य मार्गावरील होणार्‍या अपघातातील रुग्णांचे आरोग्य या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जुळलेले आहे. मात्र आरोग्य केंद्रात पुरेशा सुविधा पुरविल्या जात नसून दिवसातून केवळ दोन तासच आरोग्य सेवा दिली जात असल्याने आयएसओं मानांकित आरोग्य केंद्रच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. या आरोग्य केंद्राला कायम स्वरुपी वैद्यकिय अधिकारी नसल्याने गरजेच्या वेळे रुग्णांवर उपचार होत नाही. वेगवेगळ्या 4 वैद्यकिय अधिकारींकडे शेंदुर्णी आरोग्य केंद्राचे कामकाज दिले असल्याने चौघांमधुन कोणीही लक्ष पुर्वत नसल्याचे चित्र आहे.

चुकीचे मार्गदर्शन : शेंदुर्णी गावाला आजुबाजुचे 13 लहान मोठे गावे लागुन आहे. या गावांचे रुग्ण दररोज उपचारासाठी शेंदुर्णी येथे येतात. त्यामुळे आरोग्य केंद्राला मोठे महत्त्व आहे. या ठिकाणी महिला प्रसुतीसाठी येत असल्याचे प्रमाण मोठे आहे. महिला प्रसंतीसाठी आल्यास किंवा संर्प दंश झालेली व्यक्ति असल्यास त्यांच्यावर उपचार न करता चुकीचे मार्गदर्शन केले जाते. रुग्णांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असून तात्काळ जळगाव घेऊन जाण्याचे सल्ले दिले जातात. वास्तविक रुग्णांना तपासले देखील जात नाही.

रुग्णांचे जीव धोक्यात
शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दोनशे ते तीनशे बाह्यरुग्ण, तसेच महिन्यात किमान शंभर महिलांची प्रसूती, 30 ते 40 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होत असते. या कामगिरीबद्दल रुग्णालयास पारितोषिक सुध्दा मिळाले आहे. गेले 1 वर्षापूर्वी येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांची बालरोगतज्ज्ञ चऊ या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने ते प्रशिक्षणासाठी गेले आहे. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी नेमणे गरजेचे असतांना अद्यापही अधिकारी नेमण्यात आले नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे अनेक प्रसंग घडतात. चार वैद्यकिय अधिकार्‍यांकडे प्रत्येकी दोन दिवसाचे कामकाज देण्यात आले आहे. हे अधिकारी 24 तास त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे असतांना ते केवळ दोनच तास उपलब्ध राहतात त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्ह्यात नामांकित असून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा म्हणून विद्यमान जि. प. सदस्य सरोजिनी गरुड व मी स्वतः जिल्हा परिषद मुख्याधिकारी अस्तिकुमार पांडे यांचेशी बोललो असुन नवीन डॉक्टरांची भरती नसल्याने डॉक्टर उपलब्ध नसल्याचे ते सांगतात. डॉ.संजय सोनवणे यांना पूर्णवेळ नेमण्याची मागणी केली आहे परंतु सदरचे अधिकार आरोग्य मंत्र्यांना आहेत व ते या आरोग्य केंद्राविषयी उदासीन भूमिका बाळगून आहेत. आरोग्य विभागाकडे दक्षता समितीकडून प्रस्ताव पाठवला जाईल .
– संजय गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य

24 तास सेवा नाही
अपघातात जखमीं तसेच सर्प, विंचू, श्वान, रानडुक्कर,दंश केलेल्या रुग्णांना अँटी स्नॅक व अँटी रेबीज लस दिल्यावर 24 तास वैदयकीय आधिकारीच्या निगराणीखाली ठेवावे लागते. सध्या उष्माघात रुग्णही वाढत आहे. पण वैदयकीय अधिकारी 24 तास उपलब्ध नाही म्हणुन रुग्णांना सेवा दिल्या जात नाही व वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांना प्राणास मुकावे लागते . प्रसूतीसाठी येणार्‍या मातांना व नवजात शिशुन्नाही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पिण्याची पाण्याची देखील या ठिकाणी व्यवस्था नसल्याने हॉटेल तसेच इतर ठिकाणाहून रुग्णांसाठी पाणी आणावे लागते.