श्रीनगर : इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी काश्मीरपर्यंत घुसले असून शुक्रवारी श्रीगरच्या जाकूरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयएसने त्यांच्या एहमाक या न्यूज एजन्सीच्या संकेतस्थळावर एक पोस्ट टाकून घेतली आहे. शुक्रवारी जाकूरा येथील पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक शहीद झाला होता.
तसेच एक अतिरेकी ठार झाला होता. या अतिरेक्याने आयएसचा लोगो असलेला काळ्या रंगाचा टीशर्ट अंगात घातलेला होता. त्यानंतर दुसर्याच दिवशी आयएसने संकेतस्थळावरून हा हल्ला आपणच केल्याचं जाहीर केलं. त्यामुळे काश्मीरमध्ये आयएस सक्रिय होणार असल्याचा गुप्तचर विभागाचा संशय खरा ठरला आहे. 23 ऑक्टोबर रोजी काश्मीरमध्ये गुप्तचर विभागाने एका ट्विटर हँडलला ट्रॅक केले होते. त्यात काश्मीरमध्ये आयएसचा पहिला ग्रुप तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.