नवी दिल्ली । नोटाबंदीनंतर आयकर विभागाने जवळपास 18 लाख नागरिकांना आयकरातील त्रुटी आणि बेनामी मालमत्तेबाबत नोटीस पाठवल्या होत्या. या नोटीसला आज अखेर फक्त 60 हजार नागरिकांनी उत्तर दिले असून, चुकवलेली कराची आणि दंडाची रक्कम भरण्याची तयारी ठेवली आहे.
आयकर विभागाने 18 लाख लोकांना नोटीस पाठवल्यानंतर जवपळपास 2 लाख लोकांनी लॉग ईन केले असले तरी त्यापैकी फक्त 60 हजारच लोकांनी आपली जबाबदारी ओळखून देशाचा कर परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर माध्यमांना अधिक माहिती देताना सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी सांगितले आहे की, आम्ही अद्याप दुसरी नोटीस पाठवली नाही, वा सर्व लोकांच्या खात्यात डोकावून पाहिले नाही, कारण हा गोपनीयतेचा भंग ठरू शकतो, शिवाय या सर्वांनाच कर भरण्याची मुदत 31 मार्च आहे.
त्यामुळे अंतिम कारवाई 31 मार्चनंतरच करण्यात येणार आहे. सध्या आयकर विभागाच्यावतीने खात्यांची पडताळणी सुरू आहे. आयकरने 18 लाख लोकांना त्यांच्याजवळ असणार्या आणि नोटाबंदीनंतर बँकेत जमा केलेल्या मालमत्तेबाबत फक्त माहिती द्या, असे आवाहन केले आहे, त्यांचे स्त्रोत जर योग्य असतील तर त्यांनी कारवाईची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे चंद्रा यांनी म्हटले आहे.