‘आयकर’ला रुग्णालयांवरील कारवाईत हाती लागले मोठे घबाड

0

दागिणे, प्लॉटसह सर्व प्रकारच्या मालमत्तांची कसून चौकशी ः बेहिशोबी मालमत्ता सील

जळगाव- आयकर विभागाच्या नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी सकाळपासून जळगाव शहरातील सात रूग्णालयांवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून तपासणी केली. आज तब्बल तिसर्‍या दिवशीही दुपारपर्यंत पथकांची तपासणी सुरुच होती. यात कारवाईत पथकाला काही रुग्णालयांमधून बेहिशोबी मालमत्तेचे घबाड हाती लागल्याचे समजते. रुग्णालयांसह डॉक्टरांच्या घरातही तपासणी करुन पथकाने हाती लागलेल्या बेहिशोबी मालमत्तेला सिल केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. रात्री उशीरापर्यंत बी.जे.मार्केटमधील कार्यालयात पथकाची कागदोपत्री प्रक्रिया सुरु होती. डॉ. राजेश दाबी यांच्या रुग्णालयात हिशोबात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी होवून हाती मोठी बेहिशोबी रक्कम लागल्याचे कळते. अधिकृत माहीती मात्र, अद्याप मिळू शकलेली नाही.

जळगाव शहरातील डॉ.राजेश डाबी यांचे डाबी न्यूरो सेंटर, रिंगरोडवरील डॉ.अमोल महाजन यांचे मधुर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या पाठीमागे असलेले डॉ. राहुल महाजन यांचे चिन्मय हॉस्पिटल, मू. जे. महाविद्यालय रस्त्यालगतचे डॉ. विकास बोरोले यांचे नेत्रम हॉस्पिटल, भास्कर मार्केटमधील डॉ.सुनील नहाटा यांचे वर्धमान अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल, गोल्ड सीटी हॉस्पिटल या सात रूग्णालयांची आयकर विभागाच्या 50 पेक्षा जास्त अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकांनी तपासणीला सुरूवात केली आहे. तिसर्‍या दिवशी उशीरापर्यंत रुग्णालयाची तपासणी सुरूच होती.

टॅली ऑपरेटर, अकाऊंटरवर प्रश्‍नांचा भडीमार
रुग्णालयात कारवाईला सुरुवात करताच पथकाने रुग्णालयाचे अकाऊंटंट, टॅली ऑपरेटर यांना रुग्णांना बीले दिली जातात का, शस्त्रक्रियेसाठी किती रक्कम घेतली जाते, त्यानुसार रुग्णांना बील दिले जाते काय, हिशोबाच्या नोंदी, बिले कसे फाडली जातात काय? बँक खात्यांची माहीती, अशी प्रश्‍न विचारली. याप्रमाणे डॉक्टरांच्या घरातील रोकड, दागिणे, मालमत्तेचे कागदपत्रे आहेत काय? याबाबतही तपासणी करुन चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एका डॉक्टरांच्या घरून दागिणे जप्त
कारवाईत पथकाने मधुर हॉस्पिटलचे डॉ. अमोल महाजन यांच्या घराचीही तपासणी केली असता, यात काही दागिणे आढळून आले. ते नेमके किती हे कळू शकलेले नाही. मात्र ते फार जुने व मोठ्या प्रमाणावर असल्याने पथकाकडून ते सील करण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान डॉ. महाजन हे विदेशात पर्यटनासाठी गेलेले आहेत. त्यामुळे त्याचे वडील तसेच आई यांना बी.जे.मार्केटमध्ये कार्यालयात बोलावण्यात येवून सील करण्यात आलेल्या एैवजाबाबत स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या आहेत. याप्रमाणे तीन दिवस उशीरापर्यंत या कारवाईत पथकाला काही रुग्णालयांच्या डॉक्टरांकडे बेहीशोबी मालमत्ता व रक्कमा आढळल्याने तपासणीस विलंब होत असल्याचेही कळते