नवी दिल्ली-आयकर विभागाने देशातील अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनरांच्या शोरुमवर छापेमारी केल्याने फॅशन इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने छापेमारी केलेल्यांमध्ये प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी, रोहित बाल, शांतनू , निखिल आणि रितू कुमार यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या सर्व फॅशन डिझायनरांच्या शोरुममध्ये पैशांचे अवैध व्यवहार आणि टॅक्स चोरी केली जात होती अशी माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर ही छापेमारी करण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगितलं जात आहे. उत्तर आणि दक्षिण दिल्लीतील जवळपास २० ते २५ शोरुम आणि अनेक निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाने शोरुममधून कंम्प्यूटर, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली असून त्यातील रेकॉर्ड तपासले जणार आहेत.
रोख व्यवहारासाठी २ लाख रुपयांची मर्यादा असतानाही अनेक शोरुममध्ये ही मर्यादा ओलांडली जात होती, याबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाला मिळाली होती, त्यानंतरच ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगितले जात आहे.