आयकर विवरण पत्र दाखल करणे होणार सुलभ

0

नवी दिल्ली । आयकर विवरण पत्र भरण्याच्या अर्जात केंद्र सरकारने सुधारणा केल्या असून, आता 1 एप्रिलपासून हा अर्ज अधिक सोपा व सरळ झाला आहे. या अर्जातील काही क्लिष्ट तपशिलाचे मुद्दे कमी करण्यात आले आहेत. जेणेकरून हा अर्ज भरणे आता आधीपेक्षा सोपे होणार आहे.

नव्याने काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, पगार व उत्पन्नावरील व्याज यावरील कर भरण्याचा तपशील कमी करून आयटीआर 1अर्जात समाविष्ट करण्यात आला आहे. याला सहज असे संबोधण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2017-18 च्या अर्जात विविध कलमांखालील चॅप्टर 6 अ हा मुद्दा वगळण्यात आला असून, ज्या प्रमुख कलमांची आवश्यकता आहे तेच कायम ठेवण्यात आले आहेत. कलम 80 सी, वैद्यकीय विमा (80 डी) या अंतर्गत होणारी कपात कायम ठेवण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला अन्य मुद्द्यांखाली काही कपात करायची असेल, त्यांनी त्या पर्यायांची निवड करायची आहे. आयटीआर 1 / सहज या अर्जात 18 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यात एखादा व्यक्ती आयकर कायद्यांतर्गत कलम 80, कलम 80 सी, गुंतवणुकीतील एकूण उत्पन्न आयुर्विमा, भविष्य निर्वाह निधी आणि गृह कर्जाची परतफेड या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम आयकरातून कमी दाखवू शकतो. याशिवाय कलम 80 डी वैद्यकीय विम्याचा हफ्त्यांतर्गत एकूण करपात्र उत्पन्न म्हणून दाखवू शकतो. मात्र, ही कपात केलेली रक्कम कलम 80 सीमध्ये दाखवलेल्या रकमेपेक्षा अधिक असली पाहिजे.

या माध्यमातून अधिकाधिक लोक आयकर भरण्यासाठी प्रवृत्त होतील, असा सरकारला विश्‍वास आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 29 कोटींपैकी सहा कोटी जणांनी कर भरणा केला आहे. आयटीआर 1 अंतर्गत इ-फायलिंग ही सुविधा 1 एप्रिलपासून सुरू होत असून, 31 जुलैपर्यंत हा भरणा करण्याची अंतिम मुदत आहे. या कालावधीतच करदात्याने कर भरणे बंधनकारक आहे. वैयक्तिक माहिती आणि कर भरणा केल्याची माहिती, आधार क्रमांक व वस्तू खरेदी करतानाच कर भरल्याची माहिती (टीडीएस) त्या अर्जात थेट नमूद केली जाणार आहे.