आयटीआयच्या शुल्कात महापालिकेकडून कपात

0

पिंपरी : महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील आयटीआय शुल्कात कपात केली आहे. यामुळे अवघ्या 1500 रुपयात औद्योगिक तंत्र शिक्षण मिळणार आहे. मोरवाडी व कासारवाडी आयटीआय खासगी वर्गात मोडत आहे. त्यांनाही राज्य सरकारची प्रवेश नियमावली आणि शुल्कप्रणाली लागू आहे. त्यानुसार 20 हजार, महिला प्रशिक्षणार्थींकडून 10 हजार रुपये शुल्क आकारले जाते. शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली होती. त्यानुसार महापालिका कल्याणकारी योजनेअंतर्गत सुधारित ‘प्रवेश प्रक्रिया आणि प्रशिक्षण शुल्क धोरण 2017’ हा मसुदा तयार केला. त्यानुसार हद्दीतील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी व कासारवाडी आयटीआयमध्ये अवघ्या दीड हजार रुपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क राहणार आहे.

मोरवाडी आयटीआयमध्ये गरीब विद्यार्थी प्रवेश घेतात. आयटीआयमध्ये पूर्वी 1200 रुपये एवढे शुल्क होते. परंतु, पालिकेने त्यामध्ये वाढ करून 20 हजार रुपये केले होते. 20 हजार रुपये शुल्क अधिक होते. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. शुल्क कमी करण्याबाबत पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा, बैठका घेतल्या. त्यानंतर पालिकेने शुल्कात कपात करून दीड हजार रुपये केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक तंत्र शिक्षण घेणे सोपे होणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-अनुराधा गोरखे, नगरसेविका