आयटीआय प्रशिक्षण अवघ्या दीड हजारात

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्योगनगरीतील तरुणांना अवघ्या वार्षिक दीड हजार रुपयांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे. मात्र, शहराबाहेरील प्रशिक्षणार्थींना या शुल्काच्या दोन ते अडीचपट शुल्क मोजावे लागणार आहे. तर परप्रांतातील प्रशिक्षणार्थींना मोरवाडी आयटीआयमध्ये 20 हजार आणि कासारवाडी आयटीआयमध्ये 10 हजार रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. महापालिकेच्या आयटीआय सुधारीत प्रवेश प्रक्रिया आणि प्रशिक्षण शुल्क धोरणाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला महासभेने मंजुरी दिली.

14 अभ्यासक्रम
महापालिकेने 1992 मध्ये मोरवाडी आयटीआयची तर 2006 मध्ये मुलींसाठी कासारवाडी आयटीआयची स्थापना केली. ज्यावेळी आयटीआय सुरु झाले तेव्हा तीन ते चार ट्रेड शिकविण्यात येत. त्यावेळी आस्थापना खर्च, कच्चा माल, साहित्य खर्च कमी होता. तथापी, मोरवाडी आयटीआयमध्ये आजमितीला 14 ट्रेड शिकविले जात आहेत. 14 ट्रेडच्या 36 तुकड्यांमध्ये 806 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयमध्ये सहा ट्रेडच्या सहा तुकड्यांमध्ये 151 विद्यार्थिनी शिकत आहेत. या आयटीआयमधील प्राचार्य, निदेशक, व्यवस्थापकीय वर्ग आणि कर्मचारीवृंदावर वार्षिक तीन कोटी 58 लाख 45 हजार 407 रुपये खर्च होतो. तर, 14 लाख 72 हजार 906 रुपयांचे महसूली उत्पन्न जमा होते.

शहरी विद्यार्थ्यांनाच सवलत
महापालिका हद्दीतील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी आणि कासारवाडी आयटीआयमध्ये दीड हजार रूपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क राहणार आहे. महापालिका हद्दीबाहेरील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी आयटीआयमध्ये पाच हजार रूपये आणि कासारवाडी आयटीआयमध्ये तीन हजार रूपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क राहणार आहे. तर, राज्याबाहेरील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी आयटीआयमध्ये 20 हजार रूपये आणि कासारवाडी आयटीआयमध्ये 10 हजार रूपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे.

अनामत रक्कम 600 रुपये
तसेच प्रवेशावेळी प्रशिक्षण व ग्रंथालयापोटी जमा करण्यात येणारी अनामत रक्कम सर्व प्रशिक्षणार्थींना प्रत्येकी 600 रूपये भरावी लागणार आहे. हे प्रशिक्षण शुल्क वार्षिक, सहामाही, तिमाही एकत्रित घ्यावे. प्रत्येक सहा महिन्यानंतर प्रशिक्षण शुल्क न भरल्यास दरमहा शंभर रुपये दंड आकारावा. शैक्षणिक प्रवेश सत्र सन 2017 पासून लागू करावे. तसेच सत्र 2016 मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना शुल्काचे सुधारीत धोरण तिसर्‍या व चौथ्या शैक्षणिक सत्रासाठी लागू राहणार आहे, असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.