मुंबई – माझी मुलगी कामावरून आली. ती शून्यात नजर लाऊन बसली होती. मला काहीच कळत नव्हते. काही दिवस ती कामावर जाते असे सांगून कामावर जाते असे सांगायची. पण ती तणावाखाली दिसायची. नंतर कळले की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तिच्या कंपनीने तिला अचानक डच्चू दिला आहे… पोरीचा म्हातारा बाप सांगतो.
आयटी क्षेत्रात नोकऱ्या राहिल्या नाहीत. माझ्या कुटुंबाची मला काळजी वाटते…ही चिठ्ठी आहे पुण्यातील एका आत्महत्या केलेल्या तरूणाची….
असे हृदय पिळवटून टाकणारे अनुभव आहेत. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधून नोकऱ्या गमावलेल्या तरूण-तरूणींचे. सायक्लिनिक, युवर दोस्त अशा समुपदेशन संस्थांकडे तरूणांचे लोंढे वाढत आहेत. इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांमधून जाहीर केलेल्या नोकरकपातीचा मानसिक आघात आता भयंकर रूप धारण करीत आहेत. भारतात मानसोपचार तज्ज्ञांकडे तरूणांचा लोंढा वाढत आहे.
विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा अशा मोठ्या कंपन्यांमधील तसचे छोट्या छोटया माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील तरूण कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमावण्याची वेळ येत आहे. ऑनलाईन समुपदेशन करणाऱ्या संस्थांकडे आणि मनोविश्लेषकांकडे हे तरूण ताण-तणाव घालविण्यासाठी जात आहेत. युवर दोस्त नावाची ऑनलाईन समुपदेशन संस्था आहे. नोकऱ्या गमावलेले तरूण तरूणी वैफल्यग्रस्त झाले. एक महिन्याच्या कालावधीत जवळपास २६० अशा तरूणांचे कॉल्स संस्थेकडे आले आणि ८०० जणांनी चॅटद्वारे संस्थेकडून मानसिक समुपदेशन घेतले.
युवर दोस्तने इतक्या प्रमाणात वैफल्य आल्याचे पाहून समुपदेशनाची मोहिम अधिक तीव्र केली. महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, दिल्ली, हिमाचल प्रदेश मधून आयटी क्षेत्रातून नोकरी गमावलेल्या तरूणांनी युवर दोस्तकडे संपर्क साधला. केवळ नोकरी गमावलेलेच नाही तर अशी नोकरी जाणाऱ्यांचे ऑफिसमधील मित्रही मानसिक तणावाचे बळी पडले आहेत. रश्मी कुमार म्हणते इतक्या वर्षे एकत्र काम केले आणि अचानक आपल्या मित्राची नोकरी जाते. खूप वाईट वाटते. नोकऱ्या जातात हे पाहुनही तणाव आलेले समुपदेशनासाठी येतात असेही आढळले आहे.
इन्फोसिसचे रिचर्ड लोबो म्हणतात आयटी क्षेत्रात मोठी पुनर्रचना होत आहे. त्याचा फटका आयटी व्यावसायिकांना बसत आहे. इन्फोसिसमध्येही कामगार कपात आहे. परंतु अशा तरूणांना समुपदेशन केंद्राची सोय कंपनीने केलेली आहे, असे लोबो यांनी सांगितले.