आयटी इंजिनिअरने कुटुंब संपविले!

0

मुलाच्या आजाराने नैराश्य : मुलाचा खून करून पती-पत्नीने घेतला गळफास

पुणे : लाखाच्या घरात पगार असलेल्या आयटी इंजिनिअरने मुलाला असलेल्या फिट येण्याच्या आजारातील नैराश्यातून स्वतःचे कुटुंब संपविले. जयेशकुमार पटेल (वय 34) आणि त्याची पत्नी भूमिका पटेल (वय 30) यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर, तत्पूर्वी त्यांनी चारवर्षीय नक्ष नावाच्या मुलाचा खूनदेखील केला होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. नक्षचा मृतदेह तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत होता तर दोघा पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण होते. त्यातून जयेशने मुलगा व पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केली असावी, किंवा दोघांनीही मुलाचा खून करून आत्महत्या केली असावी, असा निष्कर्ष काढला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मृत कुटुंब हे मूळचे गुजरात राज्यातील आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.

तीन दिवसांपासून फ्लॅट बंद, सकाळी दरवाजा तोडला
जयेश पटेल याच्या नातेवाईक व मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्ष पटेल (वय 4) याला फिट येण्याचा आजार असल्याने दोघेही पती-पत्नी चिंताग्रस्त राहात होते. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही याच नैराश्यातून या पती-पत्नीने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केलेला आहे. जयेश पटेल हा येरवडा येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस होता. त्याचा पगार लाखाच्या घरात होता. तर पत्नी भूमिका ही गृहिणी होती. हे जोडपे लिंक रोडवरील वसंत विहार सोसायटीत राहात होते. मागील दोन दिवसांपासून त्यांचा फ्लॅट बंद होता. तसेच, कोणतीच हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे त्यांच्या शेजार्‍यांना संशय आला. त्यानुसार, सोसायटीच्या अध्यक्षांना या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी पटेल कुटुंबीयांना आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिघांचे मृतदेह आढळून आले. नक्षच्या तोंडाला फेस आलेला होता तर जयेश व भूमिका यांच्या गळ्यावर फाशीचे व्रण होते. त्यामुळे जयेश व भूमिकाने नक्षला औषध पाजले व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. तिघांचेही मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. नंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.

नक्षच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट!
पटेल कुटुंबीय दिवाळीच्या कालावधीत या सोसायटीत राहायला आले होते. या घटनेमुळे शेजार्‍यांनाही मोठा धक्का बसला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले, की पटेल कुटुंबीय दरवाजा उघड नसल्याने शेजारी राहणार्‍यांनी सोसायटीच्या अध्यक्ष व इतर अधिकार्‍यांना बोलावले होते. या अधिकार्‍यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, तिघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यात पती-पत्नी हे सिलिंगला गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तर मुलगा जमिनीवर मृतावस्थेत पडलेला होता. नक्षचा मृत्यू कसा झाला हे अद्याप कळले नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही ढोमे यांनी सांगितले. नक्ष याची तब्येत ठीक राहात नव्हती, त्याला फिट येण्याचा आजार होता, अशी माहिती नातेवाईक व पटेल यांच्या मित्रांनी दिली आहे. त्यांचे जबाब नोंदविले जात आहेत, असेही ते म्हणाले.