मुंबई । शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रक्रियेत महिनाभरानंतरही घोळ थांबण्याचे नाव घेत नसल्याने सरकार खडबडून जागे झाले आहे. परिणामी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम अखेर रजेवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार धारावी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर श्रीनिवास यांच्याकडे देण्यात आला आहे.
यासंदर्भात सखोल माहिती घेतली असता कर्जमाफीचा घोळ गौतम यांना भोवला असून काही दिवसातच त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा 18 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, महिना उलटला नंतरही 77 लाख शेतकर्यांपैकी केवळ 5 हजार शेतकर्यांनाच कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असल्याची माहिती आहे. शेतकर्यांना आश्वासन देऊनही कर्जमाफी न मिळाल्याने स्वपक्षीय आमदारांसह राज्यातील शेतकर्यांनी आणि विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे राज्य सरकारची ऐतिहासिक कर्जमाफी असूनही नाचक्की होत आहे. याचा फटका सत्ताधार्यांना बसला असून या रोषाचा पहिला बळी आयटीचे प्रधान सचिव गौतम ठरले आहेत.