मुंबई | आयडीबीआय-वेंगसरकर क्रिकेट अकादमीने ओव्हल मैदानात झालेल्या टोटल कप 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी विरारच्या साईनाथ स्पोर्टस क्लब संघावर 61 धावांनी दणदणीत विजय मिळविला. 50 चेंडूंत सर्वाधिक 65 धावांची खेळी करणारा कर्णधार नूतन गोएल हा अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर आणि टोटलचे दीपक जोशी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. तत्पूर्वी आयडीबीआय-वेंगसरकर अकादमीने साईनाथ स्पोर्टस क्लब विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 152 धावांची मजल मारली. नूतन गोएल (65) व वरून रागजी (34) यांनी त्यात मोलाचा वाटा उचलला. साईनाथतर्फे क्रिस्टल मेनेझिस याने 14 धावत 2 बळी मिळविले.