नवी दिल्ली: कोलकाताच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी असून पुढच्या सामन्याला कोलकाता नाइट रायडर्सचा धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेल खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे. रसेल हा कोलकात्याच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच सामन्यांमध्ये त्याने कोलकात्याच्या कामगिरीत सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात रसेल खेळणार नसेल तर आयपीएलच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी असेल.
कोलकात्याच्या यापूर्वी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रसेलला मैदानात दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मोठा फटका मारताना रसेलला स्नायूंची दुखापत झाली होती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रसेलचे स्नायू दुखावले होते. त्यानंतर कोलकात्याच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली होती. रसेलवर त्यावेळी मैदानातच उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याने फलंदाजीही केली होती. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही रसेलला दुखापत झाली होती.