कोलकाता । आयपीएलमध्ये कोलकाताच्या संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवणार्या गौतम गंभीरवर बोली न लावल्यामुळे यंदा कोलकात्याचा कर्णधार कोण? याबाबत चर्चा सुरू होत्या. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणार्या आयपीएलच्या 11 व्या सत्रात दिनेश कार्तिक कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करणार आहे, तर रॉबिन उथप्पाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी याबाबत घोषणा करण्यात आली. आयपीएलमधला अनुभव आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव पाहता दिनेशकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे, संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. अकराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने दिनेश कार्तिकवर 7.4 कोटी रुपयांची बोली लावली होती. दिनेश कार्तिकसोबत रॉबिन उथप्पाही कोलकात्याच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र, अखेर दिनेश कार्तिकने यामध्ये बाजी मारली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी शिलेदार रॉबिन उथप्पाची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आयपीएलच्या रणांगणात कोलकात्याचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना 8 एप्रिलला ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येईल.
कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्त्व करणे ही अभिमानाची बाब आहे. केकेआर आयपीएलच्या संघांपैकी एक आहे. आयपीएल, आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव पाहता दिनेशकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. अनुभवी खेळाडूंच्या या संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी उत्सुक आहे, असे दिनेशने पत्रकार परिषदेत सांगितले.
कोलकाता नाईट रायडर्स (एकूण खेळाडू – 19) : सुनील नारायण, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, ख्रिस लीन, दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, पियुष चावला, कुलदीप यादव, शुबमान गिल, इशांक जग्गी, कमलेश नागरकोटी, नितीश राणा, विनय कुमार, अपूर्व वानखेडे, रिंकू सिंह, शिवम मावी, कॅमरॉन डेलपोर्ट, मिचेल जॉन्सन, जेव्हन सिअरलेस.