नवी दिल्ली: यंदा कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा भारतात होणार नाही. यूएईत १३ व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा होणार आहे. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे यंदाची आयपीएल खेळवण्याबाबत बीसीसीआय व यूएई क्रिकेट यांच्यात चर्चाही झाली आहे. आज २ ऑगस्टला बैठक बोलविण्यात आली असून यात खेळाडूंच्या सुरक्षिततेवरही चर्चा होणार आहे. दरम्यान आयपीएलसोबतच महिला आयपीएल किंवा महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धा देखील यूएईच घेण्याबाबत विचार सुरु आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत संकेत दिले आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8/10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत होणार असल्याचे गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात महिला ट्वेंटी-20 लीग खेळवण्याची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बीसीसीआयने पीटीआयला सांगितले. पुढील वर्षी महिलांचा वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यापुर्वी भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या वन डे मालिकेच्या आयोजनाचाही विचार सुरू आहे.
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीला सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. 26 जुलैला गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. गांगुली अध्यक्षपदावर कायम रहावा यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. तोपर्यंत गांगुली या पदावर कायम राहणार आहे.