मुंबई । इंडियन प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्रसारण हक्कांसाठी सोमवारी होणार्या लिलावात काही अनपेक्षित बोली लागण्याची शक्यता बीसीसीआयला वाटत आहे. परस्पर हितसंबध आड येऊ नयेत म्हणून आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्वत:ला या लिलाव प्रक्रियेपासून अलिप्त ठेवले आहे. आयपीएलच्या प्रसारणांच्या अधिकारांचे बीसीसीआयने टिव्ही आणि डिजीटल अशी विभागणी करण्यात आली आहे. 2018 ते 2022 पर्यंत देण्यात येणार्या या अधिकारातून बीसीसीआयला सुमारे 20 हजार कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात भारतीय उपखंडातील टिव्ही प्रसारणाच्या हक्कांसोबत वेगाने वाढत असलेल्या डिजीटल मिडीयाच्या हक्कांच्या लिलावाचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या महत्वाच्या बाजारपेठांमधील जागतिक अधिकारांचा समावेश या लिलावात करण्यात आला आहे.
ऐतिहासीक लिलाव
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी कमाईच्याबाबतीत हा लिलाव ऐतिहासीक ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. जौहरी म्हणाले की, बीसीसीआयला या लिलावाच्या माध्यमातून विक्रमी कमाई होऊ शकते. मिळणारी रक्कम किती असेल याचे ठोस गणित मांडता येणार नाही, पण हा लिलावा पारदर्शी आणि सहभागी होणार्या प्रत्येकासाठी समाधानकारक ठरेल असा आमचा प्रयत्न आहे.
एअरटेल, जिओमध्ये रस्सीखेच
झगमगत्या आणि भरपूर ग्लॅमर असलेल्या या लीगच्या डिजीटल हक्कांसाठी एअरटेल आणि रिलायंस जिओमध्ये चुरस आहे. मागील वेलीस हे अधिकार 2015 पासून तीन वर्षांसाठी नोवा डिजीटलने 302.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. या लिलावात सामलि होण्यासाठी गेल्यावर्षी 18 कंपन्यांनी लिलावाची कागदपत्रे खरेदी केली होती. त्यात स्टार इंडिया, अॅमेझॉन सेलर्स सर्व्हिसेस, फॉलोऑन इंटरअॅक्टिव्ह मिडीया, ताज टिव्ही इंडिया, सोनी पिक्चर्स नेटवर्क, टाईम्स इंटरनेट, सुपरस्पोर्ट्स इंटरनॅशनल, रिलांयस जिओ डिजीटल, गल्फ डिटीएच एफझेड एलएलसी, ग्रुप एम मिडीया, बी इन, ईकोनेट मिडीया, स्काय युके, ईएसपीएन डिजीटल मिडीया, बीटी पीएलसी, ट्विटर आणि फेसबुक इंक या कंपन्यांचा समावेश आहे. याच्या तुलनेत 2008 मध्ये केवळ सहा कंपन्यानीच लिलावात स्वारस्य दाखवले होते. त्यात टिव्ही प्रसारणाचे हक्क वर्ल्ड टेल स्पोर्ट्स समूहाने 91.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. त्यानंतर एक वर्षाने सोनीने हे अधिकार 1.63 अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले होते.