चंद्रपूर – आयपीएलच्या सामन्यावरील सट्टा हरल्याने एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. रामलखन मधुकर अमृतकर (३०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो ब्रह्मपुरी शहरातील कुर्झा वार्ड येथील रहिवासी आहे. रामलखनने घराजवळ नव्यानेच तयार होत असलेल्या ब्रम्हपुरी-कुर्झा रोडवरील लेआऊटमध्ये एका बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
सकाळच्या वेळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना बाभळीच्या झाडाला रामलखनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
आयपीएलच्या सामन्यावर रामलखनने हजारो रुपयांचा सट्टा हरला होता. तसेच जुगार, दारूचे व्यसनही असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या रामलखनने आत्महत्या केली. या घटनेआधी तो नेहमी आत्महत्या करण्याची भाषा वापरत असे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण करीत आहेत.