आयपीएल होणार मोठ्ठे।

0

मुंबई । स्पॉॅट फिक्सिंग, सामना निश्‍चितीच्या प्रकरणांमुळे बदनाम झालेल्या आयपीएलला आता चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे क्रिकेट खेळाची जागतिक पालक संघटना असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेच या बदनाम लीगला मोठे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयपीएलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या लीगदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांवर ब्रेक आणण्याची तयारी आयसीसीने सुरू केली आहे.

आयसीसीच्या 7 आणि 8 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीतून त्याचे संकेत मिळाले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जगातील सर्वात महागड्या आणि घसघशीत कमाई करून देणार्‍या लीगसाठी आयसीसी दोन देशांमधील क्रिकेट मालिकांवर लीगच्या सामन्यांदरम्यान बंदी आणू शकते. आयपीएलच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने न खेळण्यासंदर्भात संलग्न देशांमध्ये सहमती झाल्यास भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वरूप कसे असेल आणि त्यात भारताची भूमिका काय असेल याचा विचार आपण करू शकतो.

इंग्लंडची असहमती
बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीदरम्यान ठेवलेल्या प्रस्तावांना आतापर्यंत केवळ इंग्लंडकडून विरोध झाला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने दोन महिन्यांसाठी दोन देशांमधील क्रिकेट मालिका न खेळवण्याच्या प्रस्तावाबाबत असहमती दर्शवली आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडची सहमती मिळवण्यासाठी बीसीसीआयने पावले उचलायला सुरुवात केली आहे. इंग्लंडमध्ये स्थानिक क्रिकेट हंगामाला जून महिन्यापासून सुरुवात होते. त्यामुळे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड दोन देशांमधील क्रिकेट मालिकेसाठी स्वत:ला मोकळे ठेवण्यास तयार होईल, असा विश्‍वास बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांना वाटत आहे. इंग्लंडमध्ये 2019 मध्ये आयसीसी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर देशात आयोजित केले जाणारे आंतरराष्ट्रीय सामने, त्यांच्या प्रसारणाच्या हक्कांसदर्भात सोमवारी नवी दिल्लीत होणार्‍या बीसीसीआयच्या विशेष सर्व साधारण सभेत चर्चा होणार आहे.

बीसीसीआयचा प्रस्ताव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 नंतर आयपीएलच्या सामन्यांदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात जगभरात दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका न खेळवण्याच्या संदर्भात एकमत होऊ शकते. सिंगापूर येथील आयसीसीच्या बैठकीत संलग्न असलेल्या देशांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी फ्युचर टूर प्रोग्राम (आगामी दोन वर्षांच्या काळासाठी विविध मालिकांचे वेळापत्रक) दाखल केले. या बैठकीत बीसीसीआयनेही बदलेले वेळापत्रक आयसीसीला दिले. यादरम्यान बीसीसीआयने, आयपीएलच्या काळात सर्व देशांनी दोन देशांमधील मालिका न खेळवण्याबद्दलचा प्रस्ताव ठेवला. सर्व देशांमधील क्रिकेटपटूंना लीगमध्ये खेळण्याची संधी देण्यासंदर्भातला प्रस्तावही समोर ठेवला आहे.