हैदराबाद । गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या आयपीएलचा कुंभमेळा आता समाप्तीच्या मार्गावर आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमींना हायहोल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सला अगदी सहज नमवून पुण्याने पहिल्यांदा दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला तर पुण्याकडून पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्सने ताकतवर कोलकाता नाईट रायडर्सला सहजगत्या नमवून अंतिम फेरी गाठली. संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखणार्या मुंबईच्या संघाला आयपीएलचा दावेदार मानले जात असले तरी क्वालीफायरमध्ये पुण्याने मुंबईला नमवून आत्मविश्वास वाढवला आहे.
युवा खेळाडूंवर लक्ष ; गोलंदाजांवर विशेष मदार
या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी फार प्रभावित केले आहे. याचमुळे फायनलमध्ये देखील युवा खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे. मुंबईच्या नितेश राणा, पंड्या बंधू तसेच बुमराह यांच्याकडून विशेष अपेक्षा असतील तर कर्णधार रोहितसह पोलार्ड, सिमन्स, पार्थिव पटेल, यांच्यावर फलंदाजीची तर मलिंगा, कर्ण शर्मावर गोलंदाजीची मदार असणार आहे. पुण्याच्या संघामध्ये अजिंक्य रहाणे आणि स्मिथने मुंबईविरुद्ध चांगली खेळी केली आहे. यामुळे या दोघांवर फलंदाजीची विशेष मदार असेल तर धोनी, तिवारी यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.
धोनीच्या नावे नवा विक्रम
महेंद्रसिंग धोनी 21 मे रोजी आयपीएल 2017 चा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर त्याच्या नावे एक नवा रेकॉर्ड होणार आहे. धोनी आपली सातवी आयपीएल फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल. आयपीएलच्या फक्त 10 सीझनमध्ये सातव्यांदा फायनलमध्ये खेळत धोनी नवा रेकॉर्ड करणार आहे. हा रेकॉर्ड आपल्या नावे करणारा तो पहिला खेळाडू असणार आहे. रविवारी हैदराबादमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यान अंतिम सामना पार पडणार आहे. यावेळी सर्वात जास्त आयपीएल फायनल खेळण्याचा रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या नावे आहे. दोघांनीही चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना सहा वेळा फायनल खेळली आहे. रविवारी पुणे संघाकडून खेळताना धोनी आपली सातवी फायनल खेळणार आहे. आयपीएलमध्ये सात वेळा अंतिम सामना खेळणारा धोनी पहिलाच खेळाडू ठरेल. मॉर्केल, एस बद्रीनाथ और रविचंद्रन अश्विन यांनी 5-5 वेळा फायनल खेळली आहे.
धोनी-रोहितची जुगलबंदी
धोनीच्या नेतृत्तवाखाली चेन्नई संघाने 2008, 2010, 2011, 2012, 2013 आणि 2015 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. 2010 आणि 2011 मध्ये त्यांनी आयपीएल चषक जिंकला होता. चेन्नई सुपरकिंग्जकवर आलेल्या दोन वर्षांच्या बंदीमुळे धोनी आणि रैनाला संघ सोडून अनुक्रमे पुणे आणि गुजरात संघाकडून खेळावे लागले आहे. तर रोहित शर्माची ही चौथी फायनल असून याआधीच्या तिन्ही फायनल रोहितच्या उपस्थितीत जिंकल्या आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाला दोनदा विजेतेपद मिळवून देण्यात रोहित यशस्वी ठरला आहे.