नवी दिल्ली – वेगवेगळ्या देशात गर्भपातासंबंधी वेगवेगळे कायदे आहेत. गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आयर्लंडमध्ये आहेत. येथे महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाला तरच गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते. मात्र, बलात्कार प्रकारात गर्भपात करण्याची अनुमती नसते. आयर्लंडमध्ये शनिवारी (२६ मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत बहुसंख्य लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्याच्या समर्थनार्थ मत नोंदवले. दरम्यान, या निकालामुळे बेळगावातील एका मुलीच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला आहे. बेळगावातील सविता हलप्पनवार हे कुटूंब आयर्लंडमध्ये घेण्यात आलेल्या गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहेत.
६६ जणांनी समर्थन दर्शवले
भारतीय डेंटीस्ट असलेल्या सविता हलप्पनवार हिला २०१२ साली गर्भपात करण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयर्लंडमधील एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता. अनेकदा मागणी करुन देखील तिला गर्भपातासाठी परवानगी मिळाली नव्हती. गर्भावस्थेत संसर्ग झाल्याने सविताचा मृत्यू झाला होता. सविताच्या मृत्यूनंतर आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात असलेल्या कठोर कायद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वरदकर यांनी शनिवारी जनमत चाचणीच्या निकालांची घोषणा केली. यात गर्भपातासंबंधी असलेले कठोर कायदे रद्द करण्यासाठी ६६ जणांनी समर्थन दर्शवले आहे.