नवी दिल्ली । तुर्कीतून परतणार्या आयसिसच्या हस्तकाला दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आली. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएने भारतीय यंत्रणांना टिपदिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संशयित हस्तकाकडून पोलिसांनी बनावट पासपोर्टही जप्त केला आहे. केरळमधील कन्नूरचा रहिवासी असलेला 30 वर्षाचा तरुण बनावट पासपोर्टच्या आधारे तुर्कीत गेला होता. तुर्कीतील विमानतळावर त्या तरुणाला अटक करण्यात आली होती. बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवेश केल्याने त्याला तुर्की पोलिसांनी अटक केली होती.
दहशतवाद्यांच्या संपर्कात होता
संशयित हस्तक हा सीरियात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. या तरुणाला पुन्हा भारतात पाठवण्यात आले होते. मंगळवारी दिल्ली विमानतळावर आगमन होताच दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्या तरुणाला अटक केली. संशयित हस्तकाचा आयसिसशी असलेल्या संबंधांचा सध्या तपास सुरु असून चौकशीनंतरच पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेला तरुण हा सीरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता, अशी माहितीही समोर येत आहे. केरळमधून आयसिसमध्ये भरती होण्यासाठी सीरियात गेलेल्या तरुणांशीही तो संपर्कात होता असा अंदाज आहे. या तरुणाने यापूर्वीही सीरियात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता.