आयसीआयसीआय बँकेसह 12 ठिकाणच्या ओट्यांवर अतिक्रमणाचा हातोडा; मनपाची कारवाई

0

जळगाव : शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रोडवरील आयसीआयसीआय बँकेसह 12 दुकानांचे ओटे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तोडण्यात आलेत. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईसाठी स्वत: मनपाचे उपायुक्त अजित मुठे , सहा.आयुक्त पवन पाटील उपस्थित होते.शहरातील गणेश कॉलनी ते शिवाजी पुतळा या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी आपले ओटे उंच केल्यामुळे दुकानांवर येणार्‍या ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत असत.त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

यासंदर्भात शहरातील नागरिकांकडून येणार्‍या तक्रारी लक्षात घेता मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी सदर ओटे तोडण्याचे आदेश दिले होते. तसेच यासंदर्भात मनपा प्रशासनाने संबंधित मालमत्ताधारकांना आपले ओटे काढून घेण्याचे जाहीर आवाहन वृत्तपत्रातून केले होते. परंतु संबंधित मालमत्ताधारकांनी स्वत:हुन ओटे न काढल्यामुळे बुधवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने 12 ओटे तोडले. यात आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकेचे एटीएम, अभिनव विद्यालय, तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, टीलू चटकदार वडा, सीएनए झेरॉक्स, डोंबिवली वडा, अशोक बेकरी, अल्फा मेडिकल आदि दुकानांसमोरील ओटे पोलीस बंदोबस्तात जेसीबीने तोडण्यात आलेत. तसेच उर्वरीत अतिक्रमणदेखील लवकरच काढण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाने जप्त केल्या दुचाकी

कोर्ट चौक ते शाहू महाराज हॉस्पिटलपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु असतांना या ठिकाणी काही मोटारसायकलींचा अडथळा निर्माण होत होता. ही बाब वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर मोटारसायकलींच्या मालकांना आपल्या दुचाकी हटविण्याच्या सूचना केल्या. परंतु काही दुचाकीधारक तेथे उपस्थित नसल्याने अशा 8 दुचाकींवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली. सदर वाहने मनपाच्या वाहनातून वाहतूक शाखेला जमा करण्यात आली आहेत.

शिवाजीनगरात आज होणार कारवाई

मनपाकडून शहरातील अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत आज शहरातील शिवाजीनगर भागातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.